भव्य सेट, स्पेशल इफेक्ट आणि अफलातून दृश्य यासाठी दाक्षिणात्य चित्रपट ओळखले जातात. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे ‘काला’ kaala. सुपरस्टार रजनीकांत Rajinikanth यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘काला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचत आहे.

पीए. रंजित दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावर येणारी धारावी झोपडपट्टीतील वस्तीही साकारण्यात आली होती. वंडरबार स्टुडिओजच्या युट्यूब चॅनलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘काला’चा दिग्दर्शक पीए.रंजित आणि कलादिग्दर्शक टी रामलिंगम धारावी कशा प्रकारे साकारली याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत.

रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटाचा सेट साकारण्यासाठी कित्येक कामगारांनी मेहनत घेतली असून, थेट चेन्नईत धारावी उभी केली आहे. धारावीतील कुंभारवाडा, ९० फीट रोड, मशिद अशी महत्त्वाची ठिकाणंही या सेटवर साकारण्यात आलं होतं. मुख्य म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण विविध भागांमध्ये करण्याऐवजी एकदाच चित्रीकरण उरकण्यासाठी म्हणून या सेटची रचना दिग्दर्शक आणि कलादिग्दर्शकाच्या गरजेनुसार करण्यात आली होती. इथे रस्त्यांच्या रुंदीपासून ते सेटवर वापरण्यात येणाऱ्या रंगापर्यंत बऱ्याच गोष्टीं ध्यानात घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रथमदर्शनी सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ हा चित्रपट खऱ्या धारावीत चित्रीत केला असल्याची अनुभूती होते.

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून नाना पाटेकर यांच्या अभिनयाचीही झलक पाहता येणार आहे. त्याशिवाय अभिनेत्री हुमा कुरेशी हिलासुद्धा या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मल्टीस्टारर ‘काला’ चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर रजनीकांत यांच्या चित्रटाकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टीकोन आणि त्या चित्रपटाच्या वाट्याला येणारं यश आता कोणता नवा विक्रम रचणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.