अभिनेता आयुषमान खुराना याची मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आयुषमान या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये आयुषमान एका नाटकात काम करणाऱ्या मुलीची भूमिका साकरत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आयुषमानची भूमिका प्रेक्षकांंच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच या भूमिकेसाठी आयुषमानचीच निवड का करण्यात आली यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे.

‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटामध्ये आयुषमानने लोकेश बिष्ट ही व्यक्तीरेखा साकारली असून हा लोकेश बिष्ट नाटकांमध्ये महिलांची भूमिका करतो. या भूमिकेला न्याय देण्यासाठी आयुषमानने प्रचंड मेहनत घेतली असून तो मुलींच्या गोड आणि सुमधूर आवाजात बोलताना दिसतो. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी केवळ आयुषमानचीच निवड का केली यामागचं कारण चित्रपटाची निर्माती एकता कपूरने सांगितलं आहे.

“ज्यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मला या चित्रपटाची स्किप्ट वाचायला दिली तेव्हा मी या कथेच्या प्रेमात पडले आणि या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी प्रथम माझ्यासमोर फक्त आणि फक्त अभिनेता आयुषमान खुरानाचा चेहरा आला. कारण आयुषमान हा उत्तम कलाकार असण्यासोबतच एक चांगला व्हॉइस मॉड्युलेशनचं काम सुद्धा करतो. त्यामुळे या चित्रपटातील स्त्री व्यक्तीरेखा साकरण्यासाठी तो योग्य व्यक्ती असल्याचं मला जाणवलं. चित्रपटातील स्त्री भूमिकेला न्याय देण्यासाठी आवाजातील चढ-उतार, आवाजातील खोली नीट जाणू शकतो”, असं एकता म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मला विश्वास होता की आयुषमान कधीच हा चित्रपट मोठा आहे लहान, चित्रपटात कोणते कलाकार आहेत, या गोष्टी पाहणार नाही. तो केवळ चित्रपटाच्या कथेला महत्व देई, आणि तसंच झालं. त्याने स्क्रिप्ट वाचली आणि आपल्या भूमिकेला न्याय देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळेच या ड्रीम गर्लसाठी आयुषमानची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली”.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशीष सिंह करत आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.