23 February 2019

News Flash

Video: वयाने मोठ्या महिलेला का डेट करतोय निक; त्यानेच केला खुलासा

निक- प्रियांकाच्या डेटविषयी चर्चा असतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, Priyanka Chopra, Nick Jonas

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल पाहायला मिळतं. अशाच काही सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख प्रस्थापित करणारी ही ‘देसी गर्ल’ आणि निक जोनास यांच्यातील कथित प्रेमप्रकरणामुळे प्रकाशझोतात आली आहे. प्रियांका आणि निक जोनास गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वारंवार चर्चेत आहेत. प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला निक तिला डेट करतोय अशा जोरदार चर्चा आहेत. याबाबत जरी दोघांनीही मौन बाळगलं असलं तरी निक- प्रियांकाची वाढती जवळीक पाहता हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत हे दिसून येतं.

निक- प्रियांकाच्या डेटविषयी चर्चा असतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निकच्या मुलाखतीचा हा जुना व्हिडिओ आहे. वयाने मोठी असलेल्या महिलेला डेट करण्याविषयी निक या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. तू डेट केलेली मात्र वयानं सर्वात मोठी असलेली महिला कोणती असा प्रश्न एका चाहत्याने निकला या मुलाखतीत विचारला होता. त्यावर हसत निकने उत्तर दिलं की, ‘मी वयावर निर्बंध घालणार नाही. पण ३३ आणि ३५ वयाच्या महिलांनाही मी डेट केलं आहे.’ यावर मुलाखत घेणाऱ्या अँडी कोहनने त्याला पुढील विचारला की, अशा महिलांमधील कोणती गोष्ट तुला सर्वाधिक आवडते? तर अशा महिलांना काय हवं आहे हे माहित असतं, असं उत्तर निकने दिलं.

प्रियांका आणि निक गेल्या महिन्यात भारतात आले होते. २०१७ पासून हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नाही तर हे दोघंही महिनाभरात साखरपुडा करणार असल्याच्याही चर्चा आहेत.

First Published on July 11, 2018 1:08 pm

Web Title: here is what nick jonas said on dating older women in a throwback interview