काल २७ डिसेंबरला सलमान खानने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. सलमानने २६ तारखेला रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला. फक्त सलमानच नाही तर त्याच्या देशभरातील चाहत्यांनीही त्याचा वाढदिवस साजरा केला. पण सलमानची ७५ वर्षीय काश्मीरमधील चाहती जायना बेगम या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या सलमानचा वाढदिवस साजरा करत आहेत. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्यांच्या कुटुंबीयाने एकत्र येऊन सलमानचा ५२ वा वाढदिवस साजरा केला.

जायना बेगम जम्मू- काश्मीर येथील अनंतनाग भागातील अशमुकाम या छोट्याशा गावात राहतात.

२०१५ (एप्रिल- मे) मध्ये सलमान जेव्हा बजरंगी भाईजान सिनेमाच्या चित्रीकरणासाठी काश्मीरला गेला होता, तेव्हा त्याची भेट जायना बेगम यांच्याशी झाली. जायना बेगम यांनी त्याला भेटण्यापूर्वीही पत्राद्वारे मदतीची मागणी केली होती.

सलमानने जायना बेगम यांची आर्थिक मदत करुन त्यांचे संपूर्ण कुटूंब दत्तक घेतले होते.

सलमानने त्यांचे नवीन घर तयार करण्यासाठी त्यांची मदत केली होती. तसेच जायना बेगम यांच्या नातवाला योग्य ते काम मिळेल याचीही सोय केली होती. आज त्यांचा नातू चांगले काम करतो.

जायना यांच्या मते, देवानेच सलमानला आमच्या मदतीला पाठवले. त्याने आमची फार मदत केली. मी दरवर्षी त्याला याच पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहीन.

जायना बेगम या विधवा असून त्यांची सूनही विधवा आहे. सुनेला तीन मुली आणि एक मुलगा आहे.