बहुप्रतिक्षित ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे आत्तापर्यंतचे ट्रेलर्स, गाणी पाहता ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी परिपूर्ण एन्टरटेन्मेंट पॅकेज ठरण्याची शक्यता आहे. एक कुटुंब आणि त्यांच्यातील नात्यांभोवती फिरणारा हा चित्रपट का पाहावा, याची पाच कारणे.

चित्रपटातील स्टारकास्ट- अनिल कपूर, शेफाली शहा, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि फरहान खान अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे या सगळ्या कलाकारांना एकाचवेळी पडद्यावर चित्रपटरसिकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर्समधून मेहरा कुटुंबाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. याशिवाय, फरहान अख्तर बऱ्याच दिवसांनी वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

झोया अख्तर- ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक झोया अख्तरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तिने आत्तापर्यंत दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये प्रवास हा मुख्य भाग राहिला आहे. याशिवाय, झोया अख्तरकडे असणारी सौदर्यंदृष्टी ही आणखी एक जमेची बाजू आहे. ‘दिल धडकने दो’च्या ट्रेलरमधून प्रेक्षकांना त्याचा पुरेपूर प्रत्यय आलाच आहे.

जहाज- चित्रपटाचा बराचसा भाग जहाजावर चित्रीत करण्यात आल्याने आजवर न पाहिलेली अनेक दृश्ये पहायला मिळणे म्हणजे प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. भूमध्य समुद्रातून प्रवास करत असलेले सर्वप्रकारच्या उंची सुखसुविधांनी सज्ज असे आलिशान जहाज यानिमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. केवळ प्रेक्षकांसाठीच नव्हे तर ‘दिल धडकने दो’ मधील कलाकारांसाठीही हा स्वप्नवत अनुभव ठरल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या सगळ्यांची परिणती पडद्यावरील कलाकारांच्या अभिनयात नक्कीच दिसून येईल.

रोमँटिक जोड्या- ‘दिल धडकने दो’मधील प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरची जोडी प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे प्रियांका-फरहानची केमिस्ट्री कितपत रंगणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. याशिवाय, रणवीर सिंग आणि अनुष्का शर्माचा जोशपूर्ण अभिनय चित्रपटाला चार चाँद लावणार आहे. ‘बँड बाजा बारात’मधील रणवीर-अनुष्काची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

चित्रपटातील लोकेशन्स- झोया अख्तरच्या यापूर्वीच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटात प्रेक्षकांना परदेशातील स्थळे आणि नयनरम्य दृश्यांचा नजराणा पहायला मिळाला होता. ‘दिल धडकने दो’ मध्येही प्रेक्षकांना स्पेन, इटली, फ्रान्स, ट्युनिशिया आणि तुर्की या देशांची सफर करायला मिळणार आहे.