संपूर्ण बॉलीवूड जगतासाठी संतापजनक अशी घटना काल पद्मावती चित्रपटाच्या सेटवर घडली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पद्मावती चित्रपटाच्या सेटवर जयपूर येथे करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तसेच त्यांनी चित्रपटाच्या सेटवर तोडफोडही केली. या घटनेच्या निषेधार्थ बॉलीवूडकर एकवटले असून त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने भन्साळी यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. आताच्या घडीला चित्रपटसृष्टीचा भाग असणे हे किती घातक आहे, हे सध्या करणला चांगलेच ठाऊक आहे.

‘घातक’, असे का? असा प्रश्न अनेकांना पडेल. बॉलीवूड हे असे विश्व आहे जिथे पैसा, प्रसिद्धी आणि ग्लॅम एका मोठ्या पिशवीत मिळाल्यासारखे असते. बॉलीवूड हा भारतातील सर्वाधिक घातक व्यवसाय का आहे, हे समजण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भन्साळींचे प्रकरण समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला? बॉलीवूडच्या उदारमतवाद्यांकडून पुन्हा एकदा भारताच्या सदाचरणावर हल्ला केला जात असल्याचा आरोप भन्साळींवर हल्ला करणा-यांनी केला आहे. संजय भन्साळी पद्मावती या चित्रपटासाठी जयपूरमध्ये असून सदर चित्रपट राजपूत कन्येवर आधारित आहे. मग, हा चित्रपट त्या हल्लेखोरांनी पाहिलाय आणि ते चित्रपटाच्या कथेशी सहमत नाहीत? त्यांना चित्रपटाची कथा आणि संवादाची स्क्रिप्ट मिळाली आहे का? किंवा त्यांना आतली खबर मिळालीय की दिग्दर्शक ख-या ऐतिहासिक कथेशी छेडछाड करत आहे? तर, यातील काहीच कारण नाही. राणी पद्मिनी म्हणजेच दीपिका पदुकोण हिच्यासह अल्लाउद्दीन खिलजी म्हणजेच रणवीर सिंग हा त्याच्या स्वप्नात रोमान्स करतानाचे दृश्य असल्याचे कानावर पडल्याने आंदोलकांनी चित्रपटाच्या सेटवर तोडफोड आणि दिग्दर्शकाला मारहाण केली. हा या बातमीचा छोटासा भाग असून तो चित्रपटाच्या क्रूकडून पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला आहे. पण, भन्साळींवर हल्ला करण्यापूर्वी हे आंदोलक यामागचे कारण जाणून घेण्यासाठी थोडाही वेळ थांबले नाहीत. जो चित्रपट अजून पूर्ण बनलाच नाही, ज्याची कथा त्यांच्या हाताला लागणे जवळपास कठीणच आहे, असे असताना त्यांनी निव्वळ चित्रपट बनतोय यावरूनच त्याच्या दिग्दर्शकाला मारहाण केली.

या आंदोलकांचा मुख्य हेतू इतिहासाचे रक्षण करणे नव्हताच. भन्साळींसाठी एक उदाहरण तयार करणे आणि केवळ हेडलाइन्समध्ये येणे इतकाच त्यांचा मुख्य उद्देश होता. बॉलीवूडमधील खान कलाकारांचे असहिष्णुतेवरील वक्तव्य, आपल्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराला काम देणारा दिग्दर्शक करण जोहर यांच्यासोबतही त्यांनी असेच केले. इतकेच नव्हे तर करण जोहरच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उभारण्यात आले होते. या घटनानंतर सदर सेलिब्रिटींनी माफी मागून जणू शांत बसण्याचीच प्रतिज्ञा केली. त्यांचे असे म्हणणे होते की, चित्रपटावर बहिष्कार किंवा बंदी घालण्याचा परिणाम केवळ त्यांच्यावर होत नाही. तर चित्रपटाच्या टीम आणि क्रूला सुद्धा त्याची झळ बसते. पण, या आंदोलकांना कुठे थांबावे हेच कळत नाही. पोलिसांनीही सुरक्षेची शाश्वती देण्याऐवजी पॅक अप करा, असे चित्रपटाच्या क्रूला सांगितले. ब-याचदा असे होते आणि सेलिब्रिटी शांत बसतात. मात्र, करण जोहरने याविरोधात आवाज उठवला आहे. त्याने लिहलेय की, चित्रपटाच्या चित्रीकरणात किंवा प्रदर्शनाच्यावेळी अशा प्रकारचे गोंधळ अनेकदा पाहिले आहेत. यावेळी मी संजयच्या भावना समजू शकतो. मी त्याच्यासोबत आहे. संजय भन्साळीसोबत जे काही झालेय त्याची मला जाणीव आहे. या इंडस्ट्रीचा भाग म्हणून आपण सर्वांनी एकजूट होऊन आपल्या क्षेत्रातील लोकांसोबत सक्षमपणे उभे राहण्याची गरज आहे.
ज्योती शर्मा बावा, इंडियन एक्स्प्रेस