मॉडेल दिशा पटानी सध्या दोन कारणांसाधी भलतीच चर्चेत आहे. एक तर टायगर श्रॉफची प्रेयसी म्हणून ती सध्या चर्चेत आहे तर दुसरीकडे एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी या सिनेमात ती महेंद्रसिंग धोनीच्या पूर्वाश्रमीची प्रेयसी प्रियंका झाची भूमिका साकारणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की धोनी त्याच्या पूर्वाश्रमीची प्रेयसी प्रियंका बरोबर असुरी भाषेत बोलायचा?
असुरी ही एक आदिवासी भाषा आहे. धोनी आणि प्रियंका कधी कधी याच भाषेत बोलायचे. एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी या सिनेमात दिशा प्रियंकाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यामुळे तिलाही असुरी भाषा शिकावी लागली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या संहितेमध्ये काही असुरी भाषेच्या ओळी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दिशाला १५ दिवसांच्या आत ही भाषा आत्मसात करायला सांगितले होते.
असुरी ही भाषा झारखंड राज्याच्या काही भागात बोलली जाते. त्यामुळे दिशाला आदिवासी भाषा तज्ज्ञ यांच्याकडून दररोज २ तास बसून ही भाषा शिकावी लागली. ही भाषा शिकायला खूप कठीण आहे. दिशाने सांगितले की ही भाषा शिकणं हे तिच्यासाठी एक आव्हान होतं. असं असलं तरी या सगळ्या प्रक्रियेतून जाताना मजाही तेवढीच आली.
‘काय पो छे’ आणि ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर सुशांत आता ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये विश्वकप विजेता महेंद्र सिंह धोनीच्या व्यक्तीरेखेत दिसेल. यात अनुपम खेर धोनीचे वडील पान सिंगची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेत्री कियारा अडवाणी ही धोनीची पत्नी साक्षी धोनी हिची भूमिका चित्रपटात साकारेल. या नव्या सिनेमात धोनीच्या आयुष्यातील विविध छटा पाहावयास मिळतात. लहानपणापासून ते तरुणपणीपर्यंतचा धोनीचा जीवनप्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
नीरज पांडे दिग्दर्शन करीत असलेला ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट रांची शहरातही शूट झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.