मराठीप्रमाणेच बॉलीवूडमध्येही यश संपादित करणारा मराठी अभिनेता श्रेयस तळपदे तब्बल सात वर्षांनी मराठी चित्रपटात नायक म्हणून परतत आहे. आयएमई मोशन पिक्चर्स, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि व्हर्च्यू एन्टरटेन्मेंट आणि दार मोशन पिक्चर्स या निर्मिती संस्था एकत्र येऊन ‘बाजी’ या मराठीतील पहिल्या सुपरहिरो चित्रपटाची निर्मिती करत आहेत. श्रेयस तळपदे चित्रपटात सुपरहिरोच्या भूमिकेत झळकणार असून, त्याच्या नायिकेच्या भूमिकेसाठी अमृता खानविलकरची निवड करण्यात आली आहे.
कोकणातल्या निसर्गरम्य ठिकाणी अॅक्शन-अॅडव्हेंचर-रोमान्स यांचे मिश्रण असलेल्या बाजी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हा एक सुपरहिरोपट असून, लोककथांमध्ये प्रचलित असलेली दंतकथा आणि वर्तमान यांवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. जुलूम आणि अन्याय यांनी पिचलेल्या सामान्य माणसाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेणा-या, दंतकथा बनलेल्या एका नायकावर आधारित ही कथा आहे. चित्रपटाचा सुपरहिरो म्हणजेच श्रेयस तळपदे हातात तलवार, बेचकी आणि पांढ-या घोड्यावर सवार झालेला दिसणार आहे. त्यामुळे मराठीतला हा पहिला सुपरहिरो पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल.
याचवर्षी ‘बाजी’ प्रदर्शित होणार आहे.