बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या बहुचर्चित ‘बँग बँग’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पायरसीच्या मुद्द्यावरून दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत इंटरनेट आणि दूरसंचार सेवा प्रदान करणाऱया कंपन्यांना इंटरनेटच्या महाजालातील ७२ संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.
चित्रपटांचे पायरसी होण्याच्या न्यायालय पूर्णपणे विरोधात असल्याची नोंद करत न्यायाधीश मनमोहन सिंग यांच्या खंडपीठाने सदर संकेतस्थळांचे मालक पायरसीच्या माध्यमातून अवैधरित्या फायदा करुन घेत असल्याचे नमूद केले. अशाप्रकारे कमाई करणे म्हणजे सपशेल फसवणूक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे या संकेतस्थळांच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘बँग बँग’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी पायरसीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन जवळपास ७२ संकेतस्थळांची यादी सादर केली होती. या संकेतस्थळांवर बंदी आणण्याची याचिका निर्मात्यांनी दाखल केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.