News Flash

उच्चशिक्षित मंत्री असतांनाही पाण्याचं नियोजन नाही – अण्णा हजारे

'एक होतं पाणी' चित्रपटाच्या निमित्ताने अण्णा हजारे म्हणाले...

रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा वास्तवदर्शी चित्रपट पांढरपेशी समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालण्यास सज्ज आहे. येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या टीमने राळेगणसिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी पाणी या विषयावर गहन चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पाण्याचं नियोजन नीट होत नसल्याचंही म्हटलं आहे.

“सध्याची स्थिती पाहता पाण्यासाठी महायुद्ध होण्याची वेळ आली आहे. जर पाणी मुबलक प्रमाणात असेल तरच गाव,तालुका, जिल्हा यांचा विकास होईल. जर या साऱ्यांचा विकास झाला तर आपोआपच राज्याचा आणि देशाचा विकास होईल”, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “आजची परिस्थिती भयानक झाली आहे. एवढे उच्च शिक्षित मंत्री व अधिकारी असतांना पाण्याच्या नियोजनाचा अभाव दिसून येतोय. वैयक्तिक सुखाच्या मागे माणूस लागल्याने पर्यायाने गावाचा विकास खुंटतोय. एक होता राजा,एक होती राणी तसे एक होतं पाणी असे म्हणण्याची खरंच वेळ येऊ नये. आज आमच्या गावात राळेगणसिद्धीमध्ये पाण्याची कमतरता नाहीये कारण गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्यावर सगळे मिळून एकजुटीने काम करतोय. गावोगावी पाण्याअभावी टँकर सुरू झाले आहेत पण आम्ही बाहेरच्या गावांना टँकर देतो. पाणी वाचवण्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे पण सरकारला मात्र केवळ मते हवी आहेत. त्यामुळे ते कायदा करायला घाबरतात. प्रत्येक गावाने एकत्र येत पाण्याचे नियोजन करणं ही काळाची गरज झाली आहे”.

दरम्यान, पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण देतो. ‘एक होतं पाणी’ ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे ? प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे? करायचं तरी काय ?या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण? याचा उहापोह ‘एक होतं पाणी’ करतं. अशा वास्तव व गंभीर विषयावर लेखन केल्याने या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर यांचे अण्णा हजारे यांनी मनापासून कौतुक केले व अशा ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:27 pm

Web Title: highly educated minister are there but still there is no water plans
Next Stories
1 ऋषी कपूर कॅन्सरमुक्त; दिग्दर्शक राहुल रवैल यांची माहिती
2 आलिया भट्टला ‘हा’ अभिनेता वाटतो रणबीरपेक्षा हॅण्डसम?
3 वरुणने जपली माणुसकी, मतदान केंद्रावर आजींना दिला मदतीचा हात
Just Now!
X