‘रॉकस्टार’, ‘जब वुई मेट’, ‘कॉकटेल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या आगामी चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अप्रतिम गाणी, संगीत आणि तगडी स्टारकास्ट हे इम्तियाज अलीच्या चित्रपटांचे वैशिष्टय़ असतेच. त्याचबरोबर संवादही वैशिष्टय़पूर्ण असतात.
जवळपास पंधरा वर्षांपासून इम्तियाज अलीच्या मनात घोळत असलेली कथा तो अखेर चित्रपटबद्ध करणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरूनच उत्सुकता निर्माण झाली असून रणदीप हुडा आणि नवोदित अभिनेत्री आलिया भट चित्रपटातील प्रमुख कलावंत आहेत.
चित्रपटाची गोष्ट ऐकूनच ए. आर. रहमानने संगीत करण्याची तयारी दर्शविली. दोन अतिशय भिन्न प्रकृतीचे तरुण-तरुणी नाईलाजास्तव ट्रकमधून प्रवास करतात आणि त्यांचे प्रेम जुळते अशी प्रेमकथा असली तरी चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक इम्तियाज अली असल्यामुळे प्रेमकथेला तो कोणती औत्सुक्यपूर्ण वळणे देईल, याबाबत बरीच चर्चा होत आहे. साजिद नाडियादवाला व इम्तियाज अली या दोघांची निर्मिती असलेला ‘हायवे’ वर्षअखेरीस प्रदर्शित होईल, असा अंदाज आहे.  
खरेतर इम्तियाजने पटकथा पूर्ण झाल्यानंतर रणबीर कपूरचाच भूमिकेसाठी विचार केला होता. परंतु, रणबीर हा बॉलिवूडमधील सर्वाधिक व्यग्र कलाकार असल्यामुळे या चित्रपटासाठी तारखा देऊ शकत नव्हता. अखेरीस रणदीप हुडाची निवड करण्यात आल्याचे समजते.