सध्या बॉलीवूडमध्ये हनी सिंगचा मोठा बोलबाला आहे. चित्रपट कोणाचाही असो, त्यात हनी सिंगचे गाणे असले तरच यशाची खात्री समजली जाते. गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये गेलेल्या हनी सिंगला पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे सध्या तो सक्तीच्या विश्रांतीवर आहे. हनी सिंगच्या या दुखापतीचा फटका स्टार प्लसवरील ‘रॉ स्टार’ या शोलाही बसला आहे. या शोच्या अनेक भागांचे चित्रीकरण त्यामुळे रखडले आहे. या पाश्र्वभूमीवर हनी सिंगच्या मदतीला त्याचा मित्र हिमेश रेशमिया धावून आला असून आता पुढील भागांचे चित्रीकरण हिमेश करणार आहे.हनी सिंग अमेरिकेला गेला असता, त्याच्या पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्याच्या गैरहजेरीचा परिणाम ‘रॉ स्टार’वर झाला आहे. त्याच्याऐवजी मीत ब्रदर्स, सचिन-जिगर, सलीम-सुलेमान या संगीतकारांनी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली होती.
त्या वेळी विश्रांतीनंतर हनी सिंग या शोमध्ये लवकरच परतेल, अशी वाहिनीची अपेक्षा होती. परंतु तो अजूनही पूर्णपणे बरा झाला नसल्याने डॉक्टरांनी त्यास चित्रीकरणासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे हनी सिंगच्या जागी परीक्षकाच्या भूमिकेत कोणाला आणायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या मित्राची ही गरज लक्षात घेऊन हिमेश रेशमिया उरलेल्या चार भागांसाठी परीक्षक बनणार आहे. हनी सिंगच्या दृष्टीने हा शो आणि यातील स्पर्धक महत्त्वाचे होते. त्यामुळे या शोबद्दल तो काळजीत होता. त्याची ही अडचण समजून घेऊन स्वत:हून या शोची जबाबदारी घेण्याची तयारी हिमेशने दाखवली. याशिवाय हनी सिंगला रेकॉर्डिग स्टुडियोमध्ये जाऊन काम करण्याससुद्धा मनाई केल्यामुळे घरच्या घरी लॅपटॉपवर बसून तो शक्य तितके काम सांभाळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 9, 2014 5:23 am