बॉलिवूडचा संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला हिमेश रेशमियाचा सगळ्यात पहिला अल्बम ‘आप का सुरूर’ हे गाणं आठवत असेल. ‘तेरा सुरुर’ गाण्यामुळे गायक हिमेश रेशमिया एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर हिमेश ‘सुरूर २०२१’ या नव्या अल्बम सॉंगमधून पुन्हा दमदार एन्ट्री करतोय. नुकतंच त्याच्या नव्या गाण्याचं टीझर मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलंय.

गायक हिमेश रेशमिया याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या नव्या अल्बमचं टीझर पोस्टर रिलीज केलाय. या टीझर पोस्टरमध्ये हिमेशच्या जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक दाखवण्यात आला असून त्याच्या जुन्या अंदाजाची झलक पहायला मिळाली. तसंच बॅकग्राऊंडला प्रेक्षकही दाखवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये त्याच्या आयकॉनीक कॅपवर ‘एचआर’ असं लिहून त्याच्या गाण्यांचा म्यूजिक लेबल ‘हिमेश रेशमिया मेलोडीज’ लॉंच करण्यात आलाय. हा टीझर शेअर करताना हिमेशने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “सुरूर २०२१ चं अल्बम टीझर पोस्टर…खूप सारं प्रेम…”, असं लिहित त्याने यात रेड हार्टचे इमोजी देखील वापरले आहेत. तसंच #loveyou हा हॅशटॅग देखील त्याने या पोस्टमध्ये दिलाय.


गायक हिमेश रेशमियाचा २००७ साली रिलीज झालेला ‘आप का सुरूर’ या त्याच्या सगळ्यात पहिल्या अल्बम सॉंगला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. याच्या अल्बम सॉंगच्या जवळपास ५५ मिलियनपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्या होत्या. मायकल जॅक्सन यांच्या नंतर हिमेशचा हा अल्बम जगभरात सगळ्यात जास्त विकला गेलेला अल्मब सॉंग ठरला. मायकल जॅक्सन यांच्या अल्बमची जगभरात ६५ मिलियनपेक्षाही जास्त कॉपीज विकल्या गेल्या होत्या.

दीपिका पादूकोणला केलं होतं लॉंच
हिमेशने त्याच्या पहिल्या अल्बम सॉंगमधून सध्याची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पादूकोणला लॉंच केलं होतं. त्यानंतर त्याच्या आगामी ‘सुरूर २०२१’ मधून कोणत्या ‘सुरूर गर्ल’ला लॉंच करणार ? याबाबत आता चर्चा सुरूये. त्याचं येणारं नवं गाणं मोठ्या स्केलमध्ये शूट करण्यात आलंय. हे गाणं टाइमलेस मेलोडी ठरणार आहे. तसंच या गाण्यात सुद्धा तो त्याच्या जुन्या अंदाजात झळकणार आहे. त्याच्यासोबत आणखी एक अभिनेत्री दिसून येणार आहे, मात्र तिचं नाव अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय.

हिमेशने त्याच्या आगामी ‘सुरूर २०२१’ बद्दल बोलताना सांगितलं, “लॉकडाऊन काळात बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या म्यूजिक लेबलच्या गाण्यासाठी काम करत होतो…पण आता प्रतिक्षा संपली आहे…मी जे लोकांसाठी कंटेट घेऊन येतोय ते योग्यच असणार आणि त्यात मी समाधानी आहे…माझा म्यूजिक लेबल हा सर्व संगीत प्रेमींसाठी आहे.”