करोना व्हायरसमुळे सध्या जगभरातील लोक त्रस्त आहेत. या विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. या प्राणघातक करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अभिनेत्री हिना खान हिने काही सोपे उपाय सुचवले आहेत. हिनाने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नका. बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जात असाल तर तोंडावर मास्क किंवा रुमाल वगैरे बांधुनच घराबाहेर पडा. असा संदेश हिनाने या व्हिडीओमध्ये दिला आहे. याशिवाय बाजारातून आणलेली फळे व भाज्या स्वच्छ कशा करायच्या याबाबतही तिने माहिती दिली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यापूर्वी असाच एक व्हिडीओ बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी करोनापासून सुरक्षित राहण्याचे सोपे उपाय देशवासीयांना सांगितले होते.

  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.
  • एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका. वापरलेला टिश्यू पेपर बंद झाकणाच्या पेटीत टाका
  • डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
  • आपले हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा
  • गरज नसताना घराबाहेर पडू नका
  • जर खोकला, सर्दी किंवा ताप असल्याचे जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे उपचारासाठी जा. इतरांपासून अंतर ठेवून राहा. जेणेकरुन तुमच्या आजारांची लागण इतरांना होणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ०११ २३९७८०४६ किंवा १०७५ या क्रमांकावर संपर्क साधा