‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांचा चित्रपट ‘हिंद का नापाक को जवाब’ काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आता विक्रमी कमाई करत अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे. ‘इंडिया टिव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहिले गेले. त्यानंतरचे काही दिवस आणि व्हॅलेंटाइन डे च्या निमित्तानेही या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढतच होता. प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच आठवड्याअखेर या चित्रपटाने ५०. २० कोटींचा गल्ला जमविला. त्यानंतर आता या चित्रपटाने एका आठवड्यात १०० कोटी रुपये कमविण्याचा विक्रम केला आहे.

‘जॉली एलएलबी २’ आणि ‘हिंद का नापाक को जवाब’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत तुलना करायची झाल्यास बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत बाबा गुरमीत राम रहीमच्या चित्रपटाने ‘जॉली’ अक्षयलाही मागे टाकले आहे असेच म्हणावे लागेल. ‘हिंद का नापाक को जवाब’ या चित्रपटामध्ये भारताने पाकिस्तावर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित कथानक साकारण्यात आले आहे. या चित्रपटाला मिळालेला अनपेक्षित प्रतिसाद पाहता सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, याच काळात अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि त्याला साथ देणारे राजीव शुक्ला यांच्या अभिनयाने अनेकांचीच मनं जिंकली आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी या चित्रपटाने ९.०७ कोटींचा गल्ला कमविला असून चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाई ६६.७९ कोटी रुपये इतकी होती. गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर प्रेक्षकांचीही याला पसंती मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नव्हते. मात्र शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केल्याचे दिसले. अक्षयच्या ‘जॉली एलएलबी २’ ने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमविला. चौथ्या दिवशी चित्रपटाने ५७.६१ कोटींचा गल्ला कमविला होता. अक्षयच्या चित्रपट कमाईचा हाच आकडा सातव्या दिवशी ७७.७१ कोटींवर पोहोचला आहे.