‘अण्णा अण्णा’ अशी चक्क हाक मारणारा एका गावातील कोंबडा तेथे लोकप्रिय तर झालाच. पण काही मराठी उपग्रह वृत्त वाहिन्यांवर त्याच बातमीने भारी टीआरपी मिळवल्याने ती बातमी पुन्हा पुन्हा दाखवावी लागली. बोलणारा कोंबडा बातमीत स्थान मिळवतोय तोच मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यात कडकनाथ कोंबडीवरुन वाद झालाय.

आपल्या सिनेमावाल्यानी कोंबडा आणि कोंबडीला चित्रपटाच्या नावापासून गाण्यापर्यंत बरेच स्थान दिलेय. ते करताना कोंबडीला अभिनय कसा शिकवला की या कोंबड्या प्रशिक्षित असतात या वादात आपण न पडलेले बरे. काही उदाहरणे तर बघा. ग्रामीण चित्रपटात एखाद्या कुटुंबात मांजर, कुत्रा यांच्यासह कोंबडी दिसणे स्वाभाविक (उदा. जुना ‘दुश्मन’) पण कधी लक्षवेधक कोंबडी ठरलीय. ‘राम और श्याम’मधील हॉटेलमधील प्रसंग एव्हाना काहींच्या डोळ्यासमोर आला असेल. खटपट्या राम (दिलीपकुमार) चिकन तंदुरीवर भारी ताव मारतो आणि निसटतो आणि तेव्हाच नेमका गरीब स्वभावाचा श्याम (दिलीपकुमार – दुहेरी भूमिकेत) त्याच हॉटेलमध्ये येतो आणि वेटर समजतो की त्यानेच कोंबडीवर ताव मारलाय. या गंमतीदार प्रसंगाला त्या काळात प्रेक्षक मनसोक्त हसून दाद देत.

दादा कोंडके दिग्दर्शित ‘पांडू हवालदार’मधील कोंबडी प्रसंग एव्हाना अनेकांना आठवून हसूदेखिल आले असेल. बेरकी आणि प्रत्येक गोष्टीचा लाभ उडवणारा सखाराम हवालदार (अशोक सराफ) एकदा कोंबड्या घेऊन जाणारी गाडी अडवतो आणि सवयीने दोन-तीन कोंबड्या त्यातून काढून सहज चालू पडतो. हा प्रसंगही मस्त दाद मिळवे. हीच कोंबडी शिजवून खाताना नळीतून सखारामला पांडू दिसतो आणि विनोद निर्मिती होते.

गाण्यातील कोंबडीची काही उदाहरणे द्यायलाच हवीत. मेहमूद दिग्दर्शित ‘जनता हवालदार’मधील राजेश खन्ना व हेमा मालिनी यांच्यावरील ‘आदी रोटी सारा ख्वाब बोल मेरे मुर्गे कुकडू कु’ (संगीत – राजेश रोशन) अशी शब्दात कोंबडी आली. तर प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जादुगर’मधील कोंबडी गाणे चक्क अमिताभ बच्चनने गायलेय, ‘पडोसन अपनी मुर्गी को रखना संभाल तेरा मुर्गा होगा दीवाना…’ या गाण्यावरून अमिताभवर भरपूर टीकादेखिल झाली. काहींना यामध्ये सवंग मनोरंजन दिसले. पडद्यावर देखील हे गाणे फारसे रंगले नाही. अमिताभने हा देखिल करमणूकीचा प्रकार आहे असे मानतच हे गाणे गायले, साकारले आणि यातच त्याची व्यावसायिकता दिसते. ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान खानने गवसलेल्या मुलीच्या आनंदासाठी ‘तेरी भूक का इलाज चिकन कुकडू कू…’ गाणे झक्कास सादर केलेय.
मराठीतील केदार शिंदे दिग्दर्शित ‘जत्रा’मधील (२००५) ‘कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली’ या गाण्यावरचे भरत जाधव व क्रांती रेडकर यांच्यावरील ‘कोंबडी नृत्य’ भन्नाट आहे. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ते वाजवले जाते. यावरूनच संगीतकार अजय-अतुलने ‘अग्निपथ’साठी ‘चिकनी चमेली…’ केले त्यावर कतरिना कैफ अंग घुसळत नाचली वगैरे वगैरे कितीही काहीही असले, तरी मूळ गाणेच कदाचित चित्रपटात नसते हे माहित्येय? अहो, गाणे चित्रीत करण्याचा दिवस आला तरी शूटिंगसाठीचे पैसेच नव्हते. ही अडचण ओळखून भरत जाधवने आपल्या घरुन पैसे आणले आणि याच गाण्याने धमाल उडवली. कू.. कू.. कू..

तर गौतम जोगळेकर दिग्दर्शित ‘पक पक पकाऽऽऽक’ (२००५) या चित्रपटाच्या नावातच कोंबडी हाक,आवाज आहे. नाना पाटेकरची यात नायकाची भूमिका आहे. चित्रपटातील एका गाण्याचा मुखडा, ‘पक पक पकाक पक…’ असा आहे. काही चित्रपटात मारहाण दृश्यात कधी कोंबड्याच्या खुराड्याला नायक वा खलनायकचा धक्का लागतो आणि कोंबड्या पडून, पळून जातात हे पूर्वापारचे दृश्य आहे. म्हटलतं तर वास्तव.

काही कलाकारांच्या फार्महाऊसवर प्राणी-पक्ष्यांत कोंबडी हमखास असते (रणजीतच्या पेणच्या, राखीच्या पनवेलच्या फार्महाऊसवर ते पाह्यला मिळाले). काही कलाकारांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. तर एका ग्रामीण मराठी चित्रपटात नायिका कोंबडीशी बोलते अशा प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळेस दिग्दर्शकाने कोंबडीला चक्क कॅमेरा कुठे आहे वगैरे सूचना देऊनदेखील ती कोंबडी अॅक्शन म्हणताच पळत सुटे म्हणून तो दिग्दर्शक खूपच हैराण झाला व त्याने कसेबसे एकदाचे शूटिंग केले असा एक किस्सा खूप रंगवून सांगितला जाई. त्यातील सूर त्या दिग्दर्शकाची थट्टाच करणारा असे म्हणूनच त्याचे व चित्रपटाचे नाव सांगणे योग्य वाटत नाही. पण मराठी असो वा हिंदी सेटवर व पार्टीत चिकन खाणारे खूप आहेत. एखाद्या रुचकर पार्टीत तर कोल्हापूरचा पांढरा रस्सा, नागपूरचे सावजी मटण अशी विविधता असते. चित्रपटाच्या यशासाठी देवापुढे कोंबडी कापणे काहींची प्रथा असू शकते. चित्रपटाच्या जगात कोंबडीची ‘पक पक पकाक पक…’ अशी केवढी तरी.
दिलीप ठाकूर