वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे

मुंबई : देशभरात करोनाचा पुन्हा झालेला उद्रेक आणि त्याअनुषंगाने मॉल-चित्रपटगृहांवर वाढत चाललेले र्निबध यामुळे हिंदीसह काही अन्य चित्रपटांचे प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. सध्या दोन हिंदी आणि एका पंजाबी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा टाळेबंदीविषयी सुरू झालेली चर्चा आणि रात्रीच्या प्रयोगांवर आलेली बंदी यामुळे एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणारे आणखी काही चित्रपट पुढे ढकलले जाण्याची शक्यता ट्रेड विश्लेषकांनी वर्तवली आहे.

गेल्या वर्षी लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि त्यामुळे बंद पडलेली चित्रपटगृहे यातून अजूनही चित्रपट व्यवसाय पूर्णपणे सावरलेला नाही. देशभरात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. अशा परिस्थितीतही निर्मात्यांनी धोका पत्करत काही चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर के ल्या आहेत. दाक्षिणात्य अभिनेता राणा डुग्गुबाती यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपटही वर्षभर प्रदर्शनासाठी ताटकळला होता. २६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र मुंबईत पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढते आहे आणि रात्रीच्या प्रयोगावरही र्निबध घालण्यात आले असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटाची मूळ तमिळ आणि तेलुगू आवृत्ती मात्र ठरल्याप्रमाणे २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यशराज प्रॉडक्शनचा ‘बंटी और बबली २’ हा बहुचर्चित चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र याही चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असल्याची घोषणा यशराज प्रॉडक्शनच्या वतीने समाजमाध्यमांवरून के ली आहे. के वळ हाच नव्हे तर यशराजच्या आणखी काही चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता ट्रेड विश्लेषकांकडून व्यक्त के ली जात आहे.

देशभरात करोनाची दुसरी लाट आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येणार नाहीत, या विचारानेच सध्या चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेतला जात असल्याचे ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांनी सांगितले, तर मुंबईत सध्या मॉलमध्ये जाणाऱ्यांनाही प्रतिजन चाचण्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे या चाचण्यांच्या भीतीनेही प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येणार नाहीत हे स्पष्ट असल्यानेच येत्या काही दिवसांत आणखी काही हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येईल, अशी माहिती ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली. देशात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये करोना रुग्णांची संख्या अद्याप आटोक्यात असल्याने तेथील चित्रपट ठरल्याप्रमाणे प्रदर्शित होत आहेत. मात्र दिल्ली, पंजाब, गुजरात येथे करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. हिंदी चित्रपटांसाठी ही बाजारपेठ महत्त्वाची आहे, त्यामुळे साहजिकच हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागणार, असे अतुल मोहन यांनी स्पष्ट केले.