कलाकार आणि त्यांचे सेटवरचे नखरे यामुळे भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुपरस्टार आणि त्यांचे नखरे यांच्या किश्शांची रेलचेल आहे. खुद्द चित्रपट दिग्दर्शकांनाही त्याची भीती वाटते. आणि त्यामुळे त्या कलाकारांकडे जाण्याचेच ते टाळतात. मात्र यामुळे क्वचित तसे नखरे करत नसतानाही कलाकारांचे नुकसान होते. असाच अनुभव अभिनेता रवी किशन यांनी ‘सोनी टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर सांगितला. नखरे करत नसतानाही त्याबद्दलच्या अनुभवांमुळे आपल्याला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाचा भाग होता आले नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

भोजपुरी अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘बाटला हाऊस’ या चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या प्रसिध्दी निमित्ताने रवी किशन ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. सध्या हिंदीतून निवडक भूमिकांमध्येच काम करणाऱ्या रवी किशन यांनी आपल्याला दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर काम करायची खूप इच्छा होती, असे सांगितले. मात्र, अनुराग कश्यप यांना रवी किशन यांना चित्रपटात घेण्याची भीती वाटत होती ही गोष्ट खरी आहे का?,  असा प्रश्न कपिल शर्मा यांनी विचारताच हो ही गोष्ट मजेशीर आहे पण खरी आहे, असे रवी किशन यांनी स्पष्ट के ले. मी सेटवर खूप नखरे करतो आणि मला राजासारखे वागवावे, अशी माझी इच्छा असते. अशा सगळ्या गोष्टी अनुराग कश्यप यांच्या मनात भरवल्या गेल्या होत्या. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं, पण त्यांच्या मनात माझी हीच प्रतिमा कायम असल्यामुळे त्यांनी इच्छा असूनही मला कधीच कुठल्या भूमिकेसाठी विचारलं नव्हतं, असं रवी किशन यांनी स्पष्ट केलं.

अखेर, कित्येक दिवसांनी आपण असे कुठलेच नखरे करत नाही हे अनुराग कश्यप यांना पटवून दिल्यानंतर त्यांना त्यांच्या ‘मुक्काबाज’ या चित्रपटात भूमिका मिळाली. मात्र आपल्याविषयीच्या या अफवेमुळे एका खूप चांगल्या चित्रपटाचा आपल्याला भाग होता आले नाही, याची रुखरूख कायम मनाला लागून राहिली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रवी किशन यांनी आजवर ६०० हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमधून काम केले आहे. मात्र ‘बाटला हाऊस’ सारखे असे काही चित्रपट आहेत जे करताना खरोखरच एक माणूस म्हणूनही आपल्यात बदल होतात. या चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर देताना आपल्याला अक्षरश: अश्रु अनावर झाले होते, असा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला.