पतीपत्नींमध्ये सांस्कृतिक किंवा वैचारिक भिन्नता असेल तर मुलांचे संगोपन नक्की कोणत्या दिशेने करायचे?, हा प्रश्न आई-वडिलांपुढे कायम असतो. अशाच भिन्न सांस्कृतिक ओढीमुळे दुरावलेल्या पती-पत्नींची कथा आणि वडील-मुलाच्या नात्यात उलगडत जाणारा अलवार संवाद ‘हिज फादर व्हॉइस’ या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.

‘कलेमुळे दुरावलेली नाती कलेच्याच माध्यमातून कशी एकत्र येतात’ या आशय सूत्राभोवती गुंफलेल्या या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक कार्तिकेयन किरूभाकरन आशयाविषयी सांगतात, हे एक असं कुटुंब नाटय़ आहे, जे भारतातच नव्हे ते जगभरात कुठेही घडू शकतं. या कथेत, भारतात आलेल्या एका अमेरिकन दाम्पत्याला इथल्या कलेची आणि सांस्कृतिक जगाची भुरळ पडते. ते दोघेही काही काळ भारतात रमतातही, परंतु आपल्या मुलाला भारतीय संस्कृतीत सहजपणे वावरताना पाहून पत्नी मात्र अमेरिकेत परतण्याची मागणी करते. त्याला पतीकडून मिळालेल्या नकारानंतर ती मुलाला घेऊन अमेरिकेत परतते. पती मात्र भारतातील कला अभ्यासण्यात रममाण झालेला असतो. अशातच पित्याविषयी द्वेष वाटत असलेला मुलगा थेट बारा वर्षांनी अमेरिकेतून भारतात येतो. इथे आल्यानंतर पित्याविषयी त्याच्या मनात असलेली प्रतिमा बदलत जाते. ती का बदलते, कशी बदलते आणि ती बदलताना तो मुलगाही भारतीय संस्कृतीच्या कशा रीतीने प्रेमात पडत जातो याचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती जगभरात पोहोचेल म्हणून भाषा माध्यम इंग्रजी निवडण्यात आल्याचे ते सांगतात. तसेच यातील कलावंतही अमेरिकेचे रहिवासी असल्याने इंग्रजीतून विषय मांडणे सोपे गेले. परंतु यातील काही गीते आणि पुराणातले संस्कृत पद्य जसेच्या तसे घेण्यात आले आहे, पण प्रेक्षकांना ते सहज समजावे यासाठी त्या पद्यांचा अर्थ अगदी साध्या सोप्या शब्दात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असेही ते सांगतात.

चित्रपटाचे चित्रीकरण तमिळनाडू येथे झाले असून एकंदर दाक्षिणात्य संस्कृतीचा, भरतनाटय़म नृत्याचा आणि कर्नाटकी संगीताचा उत्तम आविष्कार या चित्रपटातून समोर आला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील सर्व अभिनेते आणि अभिनेत्री प्रत्यक्षातही भरतनाटय़म् आणि शास्त्रीय संगीताचे उपासक आहेत, असे त्यांनी सांगितले. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक कार्तिकेयन यांचा हा पहिलाच चित्रपट असून याआधी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे. तर चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी पवार स्वत: चित्रकार आहेत, शिवाय त्यांनी गायन-नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षणही घेतले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडताना त्या सांगतात, कार्तिकेयन माझे पती असल्याने त्यांचा कथा लिहितानाचा प्रवास मी पाहत होते. तमिळनाडूमध्ये घडणारी ही कथा कुठेतरी आम्हाला जोडून घेणारी होती. कथेचे चित्रपटात रूपांतर करताना आर्थिक गणित जमवणे मोठे आव्हान होते. म्हणून परिचयातील कलाकारांना घेऊन हा सिनेमा साकारण्यात आला, शिवाय चित्रीकरणही आमच्याच घरात आणि आसपासच्या परिसरात करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. चित्रपटाचा कथाभागच गायन आणि नर्तन विश्वाने व्यापलेला असल्याने बरेचसे कलाकार हे मूळचे गायक आणि नर्तक आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक पात्र हे खरे आणि जिवंत वाटते, असे सांगतानाच स्वत:च्या भूमिकेविषयीही त्यांनी माहिती दिली. या चित्रपटात मी पार्वती या संगीत शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. भूमिके साठी आवश्यक असलेला शास्त्रीय संगीताचा अभ्यास मला वेगळ्याने करावा लागला नाही. मी स्वत: या कला सादर करत असल्याने भूमिका साकारताना पात्राशी अधिकच एकरूप होत गेले. शिवाय पार्वती ही केवळ शिक्षिका नसून तिच्या अवतीभोवती वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती समजून घेते आहे. त्यामुळे नकळत या भूमिके चा प्रभाव प्रत्येक पात्रावर जाणवतो, असे त्या म्हणाल्या.

संगीतमय बाज असलेल्या या चित्रपटातील गीते सध्या समाजमाध्यमांवर लोकप्रिय होत आहेत. वेदांत भारद्वाज यांनी संगीत दिग्दर्शन केले असून डोहाळ जेवणाच्या प्रसंगासाठी खास मराठमोळ्या गाण्याचा वापर या चित्रपटात करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. अश्विनी पवार, पी. टी. नरेंद्रन, ज्युलिया कोच, जेरमी रोस्के, सुधर्मा वैथीयंतन, ख्रिस्तोफर गुरुसामी आदी कलावंत यात प्रमुख भूमिकेत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे प्रक्षेपण परदेशात कौलालंपूर, लॉस एंजेलिस, मलेशिया, अमेरिका तर भारतात चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. नुकताच एक प्रयोग पुण्यात पार पडला. येत्या गुरुवारी, ६ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे या चित्रपटाचे प्रक्षेपण होणार आहे.