News Flash

गोडसेबाबत ‘त्या’ वक्तव्यामुळे कमल हासन यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपा- शिवसेनेकडूनही त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे

गोडसेबाबत ‘त्या’ वक्तव्यामुळे कमल हासन यांना जीवे मारण्याची धमकी
कमल हसन

‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांना जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘गोडसे यांच्याविषयी असं वक्तव्य करणारे व्यक्ती हिंदू धर्माला कलंक आहेत’, असं वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी मेरठ येथे केलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून भाजपा- शिवसेनेकडूनही त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हासन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केलं. यावेळी ”स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचं नाव नथुराम गोडसे,” असं ते म्हणाले होते. अर्वाकुरची इथं येत्या रविवारी पोटनिवडणूक होणार आहे. तिथल्या प्रचारसभेत कमल हासन यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

दरम्यान, ‘हिंदू दहशतवादावर बोलणाऱ्या अभिनेते आणि मक्कल निधी मियाम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हासन यांची जीभ छाटली पाहिजे’, असं वक्तव्य तामिळनाडूचे दुग्धोत्पादन मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी केलंदेखील होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे याने खून केला. त्यामुळे गोडसे याच्यावर सातत्याने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, असा आरोप करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. ‘माझ्या एका मित्राने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण अशा प्रश्न विचारला? त्यावर माझं उत्तर आहे गोडसे,’ असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 9:12 am

Web Title: his tongue should be chopped off bjp allies rage over kamal haasans terrorist godse remark
Next Stories
1 हॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डॉरिस डे यांचे निधन
2 या तारखेपासून सुरू होतेय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा
3 तुला पाहते रे : ‘राजनंदिनी’चा ऑफस्क्रीन पती सुबोध भावेलाही देईल टक्कर
Just Now!
X