– मितेश रतिश जोशी.

गेल्या काही वर्षात मराठी कलाविश्वामध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित मालिकांची निर्मिती सातत्याने एकामागे एक होताना दिसते आहे. यामध्येच आता अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर आधारित ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेतील स्वामींची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अक्षय मुडावदकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्याचा एकंदरीतच प्रवास जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

 

अक्षय मूळचा नाशिककर. सर्वसामान्य कलाकाराचा प्रवास जसा रंगभूमीवरून सुरू होतो, तसाच अक्षयचा अभिनय प्रवास सुरू झाला. नाशिकला महाविद्यालयात शिकत असताना राज्यनाट्य स्पर्धा तसेच कामगार कल्याणमधून अभिनयाचे धडे गिरवत पुढे व्यावसायिक रंगभूमीवर पोहोचलेल्या अक्षयने ‘गांधी हत्या आणि मी’ आणि ‘द लास्ट व्हॉइसरॉय’ या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यानंतर ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतही तो झळकला. मात्र एक अभिनेता म्हणून त्याला ओळख आणि  लोकप्रियता मिळाली ती स्वामींच्या भूमिकेतूनच.

स्वामी समर्थांच्या व्यक्तिरेखेसाठी अक्षयची निवड झाली, त्या घटनेबद्दल आजही त्याला नवल वाटतं.  एक दिवस संध्याकाळी अक्षयला प्रॉडक्शनमधून फोन आला आणि त्याला स्वामींची भूमिका करशील का ?, अशी थेट विचारणा करण्यात आली. मी स्वत: कट्टर स्वामीभक्त असल्याने नाही म्हणायला कुठे जागाच नव्हती, असं तो सांगतो. ऑडिशन आणि तत्सम प्रक्रियेतून गेल्यावर स्वामींच्या भूमिकेसाठी प्रॉडक्शनकडून अक्षय मुडावदकर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अक्षय हा फिटनेसप्रेमी असल्याने त्याची फिट शरीरयष्टी मालिके तील भूमिके साठी योग्य नव्हती. त्यामुळे मालिका सुरू होण्याआधी स्वामींच्या भूमिके नुसार शरीरयष्टी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते.

यासाठी पहिल्यांदा डाएट आणि जिमला पूर्णविराम द्यावा लागला, असे तो सांगतो. स्वामींचे पोट पुढे असल्याने त्याने चमचमीत पदार्थांवर ताव मारून तशी शरीरयष्टी तयार केली. के वळ शरीरयष्टी तशी दिसणे पुरेसे नव्हते. स्वामी साकारण्यासाठी त्यांच्याविषयाची अभ्यासही तेवढाच गरजेचा होता. त्यासाठी मी स्वामींविषयी लिहिल्या गेलेल्या जुन्या ग्रंथांचा,पोथ्यांचा अभ्यास केला.त्यातून स्वामींच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू उलगडत गेले, असे तो सांगतो. ‘स्वामींची भूमिका स्वीकारल्यावर मला कोणतंच दडपण नव्हतं. असंख्य साधकांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी, त्यांची भूमिका लीलया पेलायची जबाबदारी आपल्यावर आहे याच विचाराने मी काम सुरू के ले होते. आजही मी त्याच धारणेतून ही भूमिका करतो आहे’, असे अक्षय सांगतो. आजपर्यंत स्वामी समर्थांच्या जीवनावर अनेक चित्रपट, मालिका, वेबमालिकाही येऊन गेल्या आहेत. त्यामुळे आपली भूमिका आणि आपलं काम इतकं चोख हवं की आपली तुलना जुन्या कोणत्याही स्वामी व्यक्तिरेखेशी होता कामा नये हा निर्धार मी केला होता. आणि आज मालिकेची लोकप्रियता बघता नक्कीच आपण भूमिकेला न्याय दिला आहे असे आपल्याला वाटत असल्याचे तो सांगतो.

स्वामींची भूमिका साकारताना रोजच्या रोज रंगभूषेवरही तेवढीच मेहनत घ्यावी लागते, असे तो म्हणतो. स्वामी म्हटलं की लंगोट चढवली आणि रुद्राक्षाची माळ घातली म्हणजे झालं असं सगळ्यांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. मला स्वामी रुपात तयार व्हायला कमीतकमी एक तास जातो, असं तो सांगतो. ‘एप्रिल महिन्यात मला एका प्रसंगासाठी आदिमाया रुपात तयार केलं होतं. मी स्वत: या रूपासाठी पहिल्या दिवसापासून खूप उत्सूक होतो. आदिमाया रुप साकारण्यासाठी तयार व्हायला मला अडीच तासांचा अवधी लागला होता. तो दिवस आणि ती रंगभूषा लक्षात राहण्यासारखी आहे’, अशी आठवण त्याने सांगितली.

या मालिके मुळे अक्षयला मोठा चाहता वर्ग लाभला आहे.त्यात लहान मुलांचा तो सर्वाधिक लाडका आहे.अक्षय याविषयी सांगतो, मला या मुलांच्या पालकांचे मेसेज, फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर खूप बघायला मिळतात. तुमच्या मालिकेमुळे येणाऱ्या नवीन पिढीवर खूप चांगले संस्कार होणार आहेत,असा मेसेज मला एका प्रेक्षकाने केला होता. माझ्यासाठी ही जगात भारी प्रतिक्रिया होती. शीर्षक गीतात तल्लीन होणारी मुलं बघून समाजाच्या हिताची भूमिका स्वीकारल्याचे समाधान मिळते. त्याचबरोबर मालिके तून अनेक अनुत्तरित प्रश्नांची अचूक उत्तरं आम्हाला मिळतात अशा स्वरूपाचे मेसेजही येतात. आपण एक माध्यम होऊन योग्य काम करत आहोत याची जाणीव पदोपदी येत असल्याचे अक्षय सांगतो.

खरंतर अक्षयने आपलं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमधून पूर्ण केलं आहे. तर ‘मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट’ या विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने  १० वर्ष नोकरी केली. २०१८ च्या  डिसेंबरमध्ये नोकरीला नारळ देऊन पूर्णवेळ अक्षय घरच्यांच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्राकडे वळाला. त्याला सुरूवातीच्या काळातच ‘जय जय स्वामी समर्थ’ सारखी मालिका मिळाली आणि अभिनेता म्हणून त्याला स्वतंत्र ओळख निर्माण करता आली आहे. यापुढे अभिनयाचा हा प्रवास नेमका कसा असेल याबद्दल आत्ताच सांगणे कठीण असले तरी सध्या या मालिके तील आपली भूमिका उत्तम वठवण्यावर आपला जोर असल्याचे त्याने सांगितले.