चित्रपट ही यांत्रिक कला मानली जाते. त्यामुळे तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार हे दृक्श्राव्य माध्यम अधिक परिणामकारक होत गेलं. मात्र सिनेमातंत्र अगदी प्राथमिक अवस्थेत असतानाही दिग्दर्शक आणि इतर कलावंतांनी असामान्य प्रतिभा, साहस तसेच कल्पकता दाखवून लिखित संहितेतील स्वप्नांची दुनिया रूपेरी पडद्यावर जिवंत केली..

चित्रपटांमधील ‘व्हीएफएक्स’ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. मात्र संगणक आणि इतर अत्याधुनिक साधने नसतानाच्या काळातही चमत्कृतीजन्य परिणाम साधण्यासाठी सिनेकर्ते निरनिराळ्या क्लृप्त्यांचा अवलंब करतच होते. मात्र त्याला त्यावेळी ‘स्पेशल इफेक्ट’ किंवा ‘व्हीएफक्स’ अशी नावं नव्हती. अशा प्रकारच्या प्रसंगांना ‘ट्रिक सिन्स’ किंवा ‘ट्रिकवर्क’ म्हटलं जाई. आपल्याकडचे जुने कृष्णधवल ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमे आठवून पाहा. संत ज्ञानेश्वरांनी रेडय़ामुखी वेद वदवले. भिंत चालवली. संत तुकारामांचे इंद्रायणीत बुडविलेले अभंग पुन्हा पाण्यावर तरंगू लागले. पाठीमागच्या प्रभावळीसकट वेळोवेळी प्रकट आणि अदृश्य होणारे देवगण. राक्षसांची मायावी अस्त्रे आदी तोंडात बोटं घालायला लावणारी दृश्यं दाखवण्यासाठी प्रसंगांमध्ये काहीतरी ट्रिक करणे क्रमप्राप्त होते. भव्य-दिव्य आणि नवं साकारण्याच्या जिद्दीने भारलेली मंडळी आपापल्या सिनेमांमध्ये तसे प्रयोग करून रसिकांवर प्रभाव टाकीत होती.

अर्थात हे काम सोपं नव्हतं. कारण चित्रीकरण करताना फिल्म विशिष्ट पद्धतीने एक्स्पोझ करून परिणाम साधावा लागे. ती तारेवरची कसरतच होती. मात्र कल्पना आणि कसब पणाला लावून गेल्या पिढीतील सिनेकर्त्यांनी स्वप्नवत कामगिरी केली आहे. त्यामुळे आता एवढय़ा वर्षांनंतर आणि सिने माध्यमात तांत्रिकदृष्टय़ा प्रचंड सुधारणा होऊनही त्यांच्या या पराक्रमाला सलामच करावा लागतो. जुने चित्रपट पाहताना त्यामागची त्यांची मेहनत जाणवते. फिल्मचा अर्धा भाग आधी आणि उर्वरित नंतर चित्रित करून ते एकत्र जोडले जायचे. हिंदी सिनेमातील पहिला सुपरस्टार असा लौकिक असणाऱ्या दिलीपकुमार यांचा ‘राम और श्याम’ आठवून पाहा. १९६७ च्या या सिनेमात त्यांनी डबलरोल साकारला आहे. राम आणि श्याम दोघेही एकाच फ्रेममध्ये असलेली दृश्ये बारकाईने पाहिली तर या दोन व्यक्तिरेखांमध्ये एक अतिशय सूक्ष्म रेषा पडद्यावर दिसते. या दृश्यात कॅमेरा दोनदा रोल करण्यात आला. एकदा त्याने ‘राम’ला  चित्रित केलं आणि मग ‘श्याम’ला. अर्थात या दृश्यात अपेक्षित परिणाम साधण्यात कॅमेरामनचे कसब पणाला लागले होते. फिल्मच्या अर्धा भागावर काळी पट्टी ठेवून फक्त उर्वरित अर्धा चित्रित करायचा आणि मग पुन्हा उर्वरित फिल्मवर दुसरी व्यक्तिरेखा चित्रित करायची, अशी ती कसरत होती. मात्र स्वप्नांचे सौदागर असणाऱ्या त्या मंडळींनी जोखीम पत्करत पडद्यावरची दृश्ये अधिक जिवंत आणि खरीखुरी करण्यात प्रयत्नांची पराकाष्टा केली. ‘राम और श्याम’ला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

अगदी सुरुवातीपासूनच सिनेमांवर सर्कशीचा प्रभाव आहे. त्यामुळे सर्कशीप्रमाणेच सिनेमांमध्ये स्टंट करून प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. समोरून भरधाव रेल्वेगाडी येत असताना रूळ ओलांडणं, वन्यप्राण्यांसोबत लढाई करणं, गाडी उडविणं असे स्टंट केलेले आढळतात. त्यातले सारेच काही जिवंत, खरेखुरे वाटत नाहीत. मात्र त्यावेळी कथानकाचा परिणाम साधण्यात अशा दृश्यांची बरीच मदत झाली, हे नक्की.

प्रसंगानुसार पाऊस, अंधाऱ्या रात्री विजांचा कडकडाट, पौर्णिमेची शांत रात्र, धुके, वादळाचा देखावा करण्याची कला फार पूर्वीपासून सिनेकर्त्यांना अवगत आहे. त्यामुळे जगभरातील सिनेमांमध्ये अगदी पूर्वीपासून त्याचा वापर केलेला आढळून येतो. इमारतीची पडझड, आगीची दृश्ये हेही ट्रिक सिन्सचेच प्रकार आहेत. मात्र संगणक युग येण्यापूर्वीच्या स्पेशल इफेक्टचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे जॉर्ज लुकास दिग्दर्शित फर्स्ट ‘स्टार वार्स.’ अनंत अवकाशात घडणारी ही काल्पनिक विज्ञानकथा ‘स्पेशल इफेक्ट’शिवाय साकारणे केवळ अशक्य होते. अवकाशातील हे थरारनाटय़ साकारण्यासाठी जॉर्ज लुकास यांनी ‘इंडस्ट्रियल लाइट अ‍ॅण्ड मॅजिक’ (आयएलएम) नावाची कंपनी स्थापन केली. छायाप्रकाशाच्या या जादूने कमाल केली. ‘आयएलएम’ स्पेशल इफेक्टस्’च्या दुनियेतील कोलंबस ठरले. अगदी आताच्या काळातही त्यांचा दबदबा कायम आहे. चाकोरीबाहेरचा विचार करून त्या त्या काळात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम वापर करणं ही ‘आयएलएम’ची खासियत आहे. दिग्दर्शकाच्या संकल्पनेतील दृश्य जसंच्या तसं रूपेरी पडद्यावर साकारणं हे ‘स्पेशल इफेक्टस्’ तंत्रज्ञाचं काम असतं. ‘आयएलएम’ गेली कित्येक दशकं हे काम करत आहे. चित्रं, छोटय़ा प्रतिकृती आदींच्या साहाय्याने दुसऱ्या दुनियेतील सुंदर आणि भव्य जग या मंडळींनी साकारले.

केवळ तंत्रज्ञानामुळे कोणतीही कला समृद्ध होत नाही. यंत्रापेक्षा ते वापरणारा माणूस, त्याची प्रतिभा महत्त्वाची असते. अगदी आताच्या काळालाही ते लागू पडतं. मिठापासून तेलापर्यंत सारे अव्वल दर्जाचे सामान उपलब्ध असले तरी त्याचा वापर करून रुचकर खाद्यपदार्थ बनविणारे हात महत्त्वाचे असतात. चव हाताला असते, नाही का? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानामध्ये रोजच्या रोज सुधारणा होत आहे. मात्र मानवी प्रतिभेच्या पंखाशिवाय ते सारे व्यथ्र्य आहे.

१९९० पासून दृक्श्राव्य माध्यमात संगणकाचा वापर होऊ लागला. त्याला ‘कॉम्प्युटर जनरेटेड इमॅजरी’ (सीजीआय) म्हणतात. त्यामुळे सिनेमा माध्यमात क्रांती झाली. संगणकामुळे एकीकडे ‘स्पेशल इफेक्ट’साठी घ्यावे लागणारे त्रास, कष्ट, जोखीम कमी झाली आणि दुसरीकडे चित्रीकरणाची परिणामकारकता वाढली. चित्रपटांच्या दुनियेत संगणक आल्यावर बरेच आमूलाग्र बदल झाले. कोणत्याही नव्या गोष्टीविषयी प्रस्थापित आधी संशय आणि अविश्वास व्यक्त करतात. चित्रपट विश्वातील संगणकाच्या वापराविषयीसुद्धा असे बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. सुदैवाने त्या संक्रमणकाळाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं.

 प्रसाद सुतार – vfxwalla@gmail.com

शब्दांकन- प्रशांत मोरे