पंजाबी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता दिलजित दोसांज आता बॉलिवूडमध्येही स्थिरावतो आहे. त्याच्या चाहत्यांचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात येतेय. ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याच्या वाट्याला आणखी एक बॉलिवूड चित्रपट आला असून, नुकताच या चित्रपटातील दिलजितचा लूक समोर आणण्यात आला आहे. हॉकीपटू संदीप सिंगच्या बायोपिकमध्ये दिलजित झळकणार असून, या चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकचा टीझर सोशल मीडियावर बराच चर्चेत आला. दिलजितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही हा फोटो पोस्ट केला.

या टीझर लूकमध्ये त्याचा अंदाज आणि संदीपप्रमाणेच अगदी हुबेहूब दिसणारा दिलजित पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. #DontLetThisStoryPass अशा हॅशटॅगसह हा पोस्टर सोशल मीडियावरही ट्रेंडमध्ये आला होता. अनेकांनीच या पोस्टला लाइक करत कमेंट बॉक्समध्ये दिलजितची प्रशंसाही केल्याचे पाहायल मिळाले. चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरमध्ये दिलजित आणि संदीप असे दोघांचेही अर्धे चेहरे दाखवण्यात आले आहेत. हा फोटो पाहता आता चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळते आहे.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

शाद अली दिग्दर्शित या चित्रपटातून, संदीपच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. संदीप सिंगच्या प्रेमकहाणीवरही या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे. दिलजित दोसांजसोबतच अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा यात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. दोन हॉकी खेळाडूंची प्रेमकहाणी आणि त्यातून पुढे जाणाऱ्या कथानकाच्या आधारे हा चित्रपट साकारण्यात येणार आहे.