News Flash

रंग बरसे..

झी मराठी’ वाहिनीवर दोन जोडप्यांची पहिली होळी आहे.

होळीमागे असलेल्या धार्मिक भावनेपेक्षा नात्यातील कटुता होळीच्या अग्नीत सोडून ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ म्हणून गळाभेट करण्याची भावना अधिक महत्त्वाची वाटते. आणि एकदा या मनातल्या अनिष्टाची होळी झाली की दुसऱ्या दिवशी निस्सीम आनंदाची धुळवड करायला अधिक मजा येते. अशाच बऱ्यावाईटाची होळी करत मालिकेतील कुटुंबांनी रंगांची उधळण केली आहे. कुठे विस्कटलेली नाती जवळ आली, कुठे जवळ येण्याचा प्रयत्न सुरू आहे तर काही ठिकाणी मात्र तेढ कायम आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेत ‘होळी विशेष’ भागाची लगबग पाहायला मिळेल. वास्तवात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपल्याला अशी रंगांची उधळण करण्यास र्निबध आहेत, पण मालिकेतला उत्सव आणि उत्साह पाहून आपण सुखावायला हरकत काय..

’ ‘झी मराठी’ वाहिनीवर दोन जोडप्यांची पहिली होळी आहे. ‘माझा होशील ना’मधल्या सई आणि आदित्यची लग्नानंतरची पहिली होळी तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू आणि ओमची लग्नाआधीची पहिली होळी आहे. सई, दादा मामांच्या विचारांना छेद देऊन रंगांची उधळण करते. विशेष म्हणजे ती भांग प्यायलेली असते, त्यामुळे त्याची नशा उतरल्यानंतर कथेला खरे रंग चढणार आहेत. तर स्वीटू आणि ओम मात्र धूलिवंदन करण्यासाठी तिच्या अंबरनाथच्या घरी जातात. रंगांची उधळण करताना त्यांच्या प्रेमालाही रंग चढणार आहे. पण हा रंग पाहून नलूच्या चेहऱ्यावरचा रंग उडेल का, हे मात्र आगामी भागात कळेल.

’ स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकांमध्ये नात्यांचे बदलते रंग पाहायला मिळणार आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये होळीच्या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत आक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत आक्काचा डाव उलटला जाणार आहे. तर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत देशमुख कुटुंबात होळीचे आनंदी वातावरण असताना तिथे संजना आणि अनिरुद्ध येतात. विशेष म्हणजे देशमुखांच्या होळीचा मान तो संजनाला द्यायला सांगतो. त्यामुळे एरव्ही घराबाहेर असणारी संजना आता देशमुखांच्या घरच्या कार्यातही अनिरुद्धची बायको म्हणून येणार का याची उत्कंठा प्रेक्षकांना आहे. याच वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होळीच्या निमित्ताने दीपा आणि कार्तिक या दोघांमधले गैरसमज दूर होतील असे वाटत असतानाच दुरावा आणखी वाढला आहे. असाच दुरावा ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत शुभम-कीर्तीच्या नात्यात आला आहे. ऐन सणाच्या दिवशीही शुभम कीर्तीकडून रंग लावून घेत नाही. आता हा दुरावा आणखी किती काळ राहाणार हे पुढील भागांत कळेलच.

’ ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत संजू आणि रणजीत यांच्या नात्यातील गुंता आता कुठे सुटू लागला आहे. एकीकडे पंजाबराव रणजीतला विभा प्रकरणावरून वेठीस धरत आहेत, तर दुसरीकडे संजूला त्रास देण्यासाठी राजश्रीने कंबर कसली आहे. होळी विशेष भागातही राजश्री संजूची पुस्तके होळीत टाकते. या प्रसंगाने संजू खचून जाणार की होळीतल्या ज्वालेसारखी पेटून उठणार याची उत्सूकता आहे.

’ ‘सोनी मराठी’वरील ‘असं माहेर नको गं बाई’ या मालिकेत कामानिमित्त नाशिकला गेलेल्या कुणालला मुंबईच्या धुलीवंदनाची सवय असल्याने तो सकाळी रंग खेळण्यासाठी तयार होतो. पण नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंग खेळतात हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याचा हिरमोड होतो. पण त्याची सासू अनुसया त्याच्यासाठी धुलीवंदनाची व्यवस्था करते. तर ‘श्रीमंताघरची सून या मालिकेत’ या मालिकेत अरुणा आणि अनन्या ‘सासू-सून पुरणपोळी स्पर्धेत भाग घेतात. त्यामुळे पुरणपोळी करताना त्यांच्या नात्यातला गोडवा वाढतो आहे का हे पाहणे विशेष ठरेल.

’ ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत केतकर आणि देशपांडे कुटुंबीय एकत्र होळी साजरी करणार आहेत. नचिकेतचे वडील रवी देशपांडे यांच्या मदतीमुळे नचिकेत आणि सईचे नाते अप्पा आणि इरा दोघांनी स्वीकारले. एवढेच नव्हे तर त्यांचा साखरपुडादेखील झाला. त्यामुळे केतकर-देशपांडे ही दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन होळीचा आनंद लुटणार आहेत.

त्यानिमित्ताने चित्रीकरणाचा भाग म्हणून कलाकारांनी साजरी केलेल्या ‘रंग बरसे’ची काही क्षणचित्रे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:13 am

Web Title: holi special episode in marathi tv serial zws 70
Next Stories
1 राष्ट्रीय पुरस्कारांवर ची मराठी मोहोर
2 हृतिक रोशन आणि सैफ अली खान आमनेसामने
3 Picasso Movie Review : आनंदाचा झरा
Just Now!
X