19 March 2019

News Flash

‘हा’ हॉलिवूडचा सुपरस्टार ‘बाहुबली’च्या प्रेमात, प्रभासवर उधळली स्तुतीसुमनं

अभिनेता प्रभासने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीला माहित असलेलं हे नाव 'बाहुबली' सिनेमामुळे जगभरात पोहोचलं.

संपूर्ण देशात ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ सिनेमाने हलकल्लोळ माजवलेला. हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर कित्येक आठवडे प्रत्येकाच्या तोंडी याच सिनेमाची चर्चा होती. या सिनेमाने अनेक भारतीय सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आणि नवीन प्रस्थापितही केले. ‘बाहुबली’मुळे अनेक कलाकारांना त्यांची अशी स्वतंत्र ओळख मिळाली. अभिनेता प्रभासने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीला माहित असलेलं हे नाव ‘बाहुबली’ सिनेमामुळे जगभरात पोहोचलं. जगभरातून प्रभासवर प्रेमाचा वर्षाव होत होता. अशाच कोट्यवधी चाहत्यांमधील एक नाव हॉलिवूडचा सुपरस्टार विन्सटन ड्यूकचं आहे.

‘ब्लॅक पँथर’ स्टार विन्सटन ड्यूकच्या अनेक आवडत्या सिनेमांच्या यादीत बाहुबली सिनेमाचाही समावेश आहे. विन्सटन फक्त ‘बाहुबली’ सिनेमाचाच चाहता आहे असे नाही तर तो प्रभासच्या अभिनयाचाही चाहता झाला आहे. प्रभासचे कौतुक करताना तो अजिबात थकत नाही. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर ‘बाहुबली- द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली- द कनक्ल्यूजन’ या दोन्ही सिनेमांचे काही फोटो शेअर केले होते. विन्सटनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले होते.

सिनेमाबद्दल बोलताना विन्सटनने लिहिले की, ‘प्रभास एक राजा आहे. मला जे कलाकार आवडतात त्यातील एक प्रभास आहे. प्रभासच्या दिर्घायूषासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’ यानंतर विन्सटनने पुन्हा एकदा ‘बाहुबली’ सिनेमा पाहिला याबद्दलही सोशल मीडियावर लिहिले. हा सिनेमा जागतिक पातळीवर उत्कृष्ट सिनेमा आहे आणि प्रभासच्या अभिनयाने हा सिनेमा अधिक खुलला असे विन्सटने म्हटले. टीमच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळेच या सिनेमाला घवघवीत यश मिळाले असेही विन्सटन म्हणाला. त्यामुळे प्रभास आणि बाहुबलीच्या क्रेझमधून विन्सटनही स्वतःला वाचवू शकला नाही असेच म्हणावे लागेल.

प्रभास लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करत आहे. त्याच्या ‘साहो’ सिनेमातून तो बॉलिवूडकरांची मनं जिंकायला सज्ज झाला आहे. या सिनेमाचे चित्रीकरण सुरू असून काही महिन्यांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. बाहुबली सिनेमानंतरचा प्रभासचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा या सिनेमाकडे लागून राहिल्या आहेत.

First Published on April 17, 2018 1:00 pm

Web Title: hollywood black panther actor winston duke loves bahubali