संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाचे एकीकडे बॉलिवूड कलाकार समर्थन करत असतानाच आता हॉलिवूड कलाकारसुद्धा पुढे सरसावले आहेत. हॉलिवूड अभिनेत्री रुबी रोजने अभिनेत्री दीपिका पदुकोणची साथ दिली आहे. रुबीने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझी मैत्रीण ज्या परिस्थितीला सामोरे जात आहे, ते पाहून मी स्तब्ध झाले. पण तिची हिंमत आणि तिचे साहस पाहून मला आश्चर्य वाटतेय. मी जितक्या महिलांना ओळखते, त्यामध्ये तू सर्वांत जास्त कणखर आणि खंबीर आहेस,’ असे ट्विट रुबीने केले. ‘xXx : द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलिवूड चित्रपटात रुबीने दीपिकासोबत काम केले होते.

‘पद्मावती’मध्ये दीपिका राणी पद्मिनीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाला विविध संघटनांकडून होणाऱ्या तीव्र विरोधाची धार अजूनही कायम आहे. उलट गेल्या काही दिवसांमध्ये यामध्ये आणखीन भरच पडली आहे. त्यामध्ये आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी जवळ येऊन पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत चित्रपटातील कलाकारांना राजपूत करणी सेनेकडून धमक्याही देण्यात आल्या. ही सर्व परिस्थिती पाहता एकीकडे मुंबई पोलिसांनी दीपिका व दिग्दर्शक भन्साळी यांची सुरक्षा वाढवली आहे. तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांचे कारण देत चित्रपट पुन्हा निर्मात्यांकडे पाठविला असल्याचे कळते.

१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावती’मध्ये दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. दीपिका राणी पद्मिनीची, शाहिद महारावल रतन सिंहची तर रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.