|| पंकज भोसले

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून साहित्य, पत्रकारिता आणि चित्रपट या तिन्ही आघाडय़ांना तिरकस विनोदाची धार आली. नोव्हेंबर २०१६ पासूनच बहुतांश आघाडीच्या खूपविक्या लेखकांनी थेट नावानिशी ट्रम्प यांना झोडून काढले. एका ऑनलाइन मासिकाने राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात एक काल्पनिक कथा छापण्याचा धडाका लावला होता. तर चित्रपट आणि विनोदी मालिकांतील व्यक्तिरेखांना अमेरिकेच्या राजकीय स्थितीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या भाष्य करीत टाळ्या गोळा करायची संधी मिळाली.

गेल्या शतकभरापासून हॉलीवूडमधील रोमॅण्टिका या दोन जिवांमध्ये अवघड वळणांवरून सुकर प्रेमाची गोष्ट दाखविण्यामध्ये रंगल्या आहेत. जगात कितीही अडचणी आल्या तरी नशीब-नियती आदी सक्रिय झालेले घटक, भरपूर भावनांचा थरार साधून डोळ्यांतून अश्रूसडा साधणाऱ्या दृश्यमालिकांची जंत्री यांनी या रोमॅण्टिका पैसा वसूल झाल्याचे समाधान प्रेक्षकांना देतात. बॉलीवूडची मधली काही दशके या प्रेमाळू परंपरेच्या अनुसरणात फार विनोदी चित्रपट देऊन गेली. या चित्रपटांमधील लक्षणीय प्रेमवैशिष्टय़ म्हणजे नायक-नायिका एकमेकांच्या डोळ्यांत पाहात असताना सुरू होणारी अतिशयोक्तीसंपन्न वर्णनांची गाणी किंवा वाद्यसंगीत. बॉलीवूडच्या विनोदवेडय़ा प्रेमाळू दशकांतील चित्रपटांची सांगीतिक आठवण काही महिन्यांपूर्वी आलेल्या दिग्दर्शक जोनाथन लेव्हिन यांच्या ‘लाँग शॉट’ या चित्रपटास पाहिल्यावर तीव्र होईल. कारण येथील प्रेमप्रवास आपल्याकडच्या देहभान हरपून प्रेमरंगी रंगणाऱ्या कचकडय़ांच्या नायक-नायिकांसारखा आहे. पण प्रेमकथा ही निव्वळ गमतीची गोष्ट असून अप्रत्यक्षरीत्या अनेक आघाडय़ांवर राजकीय स्थितीची सहजपणे उडविलेली खिल्ली हा इथला महत्त्वाचा भाग आहे.

तऱ्हेवाईक राष्ट्राध्यक्ष, बडय़ा उद्योगसमूहांनी अंकित केलेले माध्यमविश्व, जगातील पर्यावरणरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये येणारी राजकीय आडकाठी आदी मुद्दय़ांवर विनोदवीर सेथ रोगन आणि सर्वार्थाने तगडय़ा चार्लीज थेरॉन या जोडीकडून अतिगंभीर चर्चा होणे अपेक्षितच नसल्याने ‘लॉँग शॉट’ ही पुरेपूर मनोरंजन करणारी राजकीय रोमॅण्टिका आहे.

चित्रपटात फ्रेड फ्लेअरस्की (रोगन) हा शोध (आणि क्रोध) पत्रकार आहे. खळबळजनक आणि स्फोटक बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रात तो स्तंभलेखन देखील करतो. चित्रपटाची सुरुवात जिवावर बेतणाऱ्या त्याच्या झुंजार पत्रकारितेद्वारे होते. त्यातून नवी स्फोटक बातमी घेऊन वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर त्याला त्याचे वृत्तपत्र बडय़ा समूहाने विकत घेतल्याची ताजी बातमी मिळते. वैचारिक निषेध म्हणून तो ‘पत्रकारिता संपली आज मित्रांनो’ ही घोषणाबाजी करीत राजीनामा देऊन टाकतो.

कफल्लकतेसह बेकारीही सोबतीला आल्याने आपल्या एकुलत्या एक मित्राकडे दु:ख साजरा करण्यासाठी जातो. बडा उद्योजक असलेला हा मित्र त्याला एका श्रीमंती सोहळ्यामध्ये दारू आणि गाण्यांच्या आस्वादासाठी नेतो. विषण्ण मनाने सांगीतिक सोहळा पाहताना त्याची दृष्टभेट तेथे आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री शालरेट फिल्ड (चार्लीज थेरॉन) हिच्याशी होते. प्रभावशाली महिला म्हणून जगासाठी ओळखल्या जाणाऱ्या या तरुण-देखण्या शालरेटबाबत फ्रेडची स्मृती लहानपणी काहीकाळ आपला सांभाळ करणारी तरुणी म्हणून असते. (त्याचा फ्लॅशबॅकही सेथ रोगनच्या टोकदार विनोदाच्या जातकुळीचा) म्हणूनच देशाच्या उच्च राजकीय स्थानावर पोहोचलेल्या शालरेटला फ्रेड आपली जुनी ओळख दाखवत नाही. शालरेट मात्र आपल्या सुरक्षा ताफ्याद्वारे त्याला पाचारण करून ‘तुला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटते.’चा सूर आळवते. आपण एकमेकांच्या शेजारी राहात असल्याची आठवण फ्रेड करून देतो. पुढल्या काही मिनिटांतच सोहळ्यामध्ये फ्रेडला आपल्या विनोदी करामती सादर करण्याची संधी मिळते आणि त्या बळावर त्याची बेकारी संपुष्टात येते. शालरेटच्या ताफ्यात भाषणे लिहिण्यासाठी फ्रेडची नेमणूक केली जाते.

सर्वात प्रबळ राष्ट्राची परराष्ट्रमंत्री म्हणून चालणारा शालरेटचा देशोदेशीचा अव्याहत प्रवास, तिची पुढील राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक लढविण्यासाठी सुरू झालेली प्रतिमावर्धनाची तयारी यांच्यात अगदीच तिकडम म्हणून शोभणाऱ्या फ्रेडच्या प्रेमगमती एकत्र झाल्या आहेत. इथला राष्ट्राध्यक्ष हा चित्रपट अभिनेता असून देश चालविण्यापेक्षा त्याला सिनेमा आणि टीव्हीमध्ये झळकण्यात अधिक स्वारस्य आहे. फ्रेडने लिहून दिलेल्या भाषणांमुळे दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरांवर पोहचणारी शालरेट त्याच्यासोबत ड्रगधुंद होऊन धिंगाणा घालताना दिसते आणि त्याच नशेत दहशतवाद्यांशी दूरध्वनीवरून वाटाघाटी करतानाही दाखविली जाते. भारतीय प्रेमपटांमध्ये अचानक गाणी सुरू होण्यापूर्वी नायिकेच्या होणाऱ्या चेहऱ्याशी तंतोतंत साम्य असलेला लज्जोत्तम मुखडा येथे फ्रेडच्या दर्शनानंतर शालरेटचा पाहायला मिळतो.

एकंदर इथे गंभीर काहीच नाही, विस्मरणीय प्रसंगांची रेलचेल असूनही दोन्ही अभिनेत्यांनी इथल्या विनोदाला उत्तम न्याय दिला आहे. अमेरिकेत पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची ऐतिहासिक घटना या चित्रपटाच्या काल्पनिक गोष्टीत का होईना पूर्ण झालेली आहे, अन् त्यानंतर पहिला ‘फर्स्ट मिनिस्टर’ बनण्याचा मानही नायकाला मिळालेला आहे. औटघटकेची करमणूक म्हणून चित्रपट पाहणाऱ्यांना लॉँग शॉट अपेक्षेपेक्षा अधिक खिळवून ठेवू शकेल.