‘कधीही न बुडणारे जहाज’ म्हणून ख्याती असणाऱ्या टायटॅनिक या जहाजाला बऱ्याच वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. जवळपास १०४ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या घटनेचा कोणालाही विसर पडला नाही. त्यामागचे कारण म्हणजे ‘टायटॅनिक’ हा चित्रपट. जेम्स कॅमरुन या दिग्दर्शकाने टायटॅनिकचा हा पहिला आणि शेवटचा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने ही जबाबरादी लिलया पेललीसुद्धा.

१९९७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या चित्रपटातून प्रेमाची वेगळी परिभाषा मांडण्यात आली होती. किंबहुना आजही हा चित्रपट अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टचा भाग आहे. असा हा ‘टायटॅनिक’ पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नुकताच ‘टायटॅनिक’चा नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला दिग्दर्शक जेम्स कॅमरुन या चित्रपटाचा नव्या अंदाजात अनुभव घेण्याची प्रेक्षकांना विनंती करताना दिसत आहेत. १ डिसेंबरला पुन्हा प्रदर्शित होणारा हा चित्रपट सध्या अमेरिकेतच दाखवण्यात यणार आहे. पण, भारतातील प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद ऑनलाइन घेता येणार आहे. अमेरिकेच्या ‘एएमआर थिएटर्स’मध्ये आठडाभरासाठी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर बराच चर्चेत असून, जॅक आणि रोजच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…

एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित कथानकाला जेम्स कॅमरुन यांनी मोठ्या पडद्यावर न्याय दिला होता. या चित्रपटाने बरेच विक्रमही मोडित काढले होते. खऱ्या अर्थाने ही त्या जहाजाची दु:खद अंत होणारी करुण कहाणी होती. १५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक समुद्रात बुडाले. ‘व्हाइट स्टार लाइन कंपनी’चे हे ५२ हजार टन वजनाचे जहाज १० एप्रिलला इंग्लंडमधील साऊथ हॅप्टनमधून न्यूयॉर्कच्या दिशेने निघाले होते. ही त्या जहाजाची पहिलीच सफर होती. पण, १४ एप्रिलला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागरातील प्रवासादरम्यान विशाल हिमनगावर ते आदळले आणि त्यानंतर अवघ्या २ तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन ‘टायटॅनिक’ने जलसमाधी घेतली होती.