पहिल्याच दिवशी ‘मोगली’ची कमाई दहा कोटी; बॅटमॅन-सुपरमॅनच्या लढाईलाही तुफान प्रतिसाद
दरवर्षी उन्हाळी सुट्टी गाजविणाऱ्या बॉलीवूडची मक्तेदारी मोडून काढत यंदा प्रथमच सलग तीन-चार आठवडे ‘हॉलीवूडपटां’चाच चित्रपटसृष्टीवर वरचष्मा राहणार आहे. गेल्या तीन-चार आठवडय़ांत सलग चार हॉलीवूडपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’ने चांगली कमाई केली असून शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बुक’ या डिस्नेपटानेही पहिल्याच दिवशी १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत अ‍ॅनिमेशनपट, सुपरहिरो सिक्वलपट भारतात नेहमीच प्रदर्शित केले जातात. त्यातही डीसी-माव्‍‌र्हल कॉमिकच्या या सुपरहिरो पटांना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे खास एप्रिल-मे या दोन महिन्यांत असे हॉलीवूड सिक्वलपट भारतात मुद्दाम प्रदर्शित केले जातात. मार्च सरता सरता ‘झुटोपिया’ आणि त्यानंतर डीसी कॉमिकचा सिक्वलपट ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’ या चित्रपटाने तिकीटबारीवर आत्तापर्यंत ३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट अनेक चित्रपटगृहांमध्ये सुरू असून भारतात सर्वाधिक यश मिळवणाऱ्या हॉलीवूडपटांपैकी हा सातवा चित्रपट ठरला आहे. मात्र, ‘जंगल बुक’ने या चित्रपटाला मागे टाकले आहे.
दरम्यान, ‘द जंगल बुक’ला मिळालेला प्रतिसाद अपेक्षितच होता. इतक्या भव्य प्रमाणात झालेली ‘द जंगल बुक’ची निर्मिती पाहण्याची ही पहिलीच संधी भारतीय प्रेक्षकांना मिळाल्याने हा चित्रपट पुढच्या काही दिवसांत खूप चांगली कमाई करेल, असा होरा ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांनी वर्तवला.

आगामी आकर्षण..
कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर
एक्समेन : अ‍ॅपोकॅलिप्स
अँग्री बर्ड्स
द हंट्समन : विंटर्स वॉर