पंकज भोसले

‘क्रिटिक-प्रूफ’ चित्रपट ही संकल्पना गेल्या दोनेक दशकांत वापरली जात असली, तरी सिनेमा उद्योगाच्या आगमनापासून ती कार्यरत आहे. आज माध्यमांच्या विस्तारामुळे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कुणीही चित्रपट समीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. पण तरी सर्व प्रकारच्या परीक्षण-समीक्षणाच्या बऱ्या-वाईट माऱ्यांना थोपवण्याची कवच-कुंडले घातलेल्या सिनेमांचे काहीही वाकडे होत नाही.

उत्तर-मध्य भारतात एके काळी अमिताभ बच्चन यांचे कुठलेही चित्रपट ब्लॉकबस्टर्स का ठरत, दक्षिणेत रजनीकांतच्या सिनेमांची दर्शकांकडून पूजा का केली जाते, हिंदीमधील निवडक नायकांच्या चित्रपटांचा गल्ला कितीही वाईट टीका झाली तरी शंभर कोटींचा आकडा कसा गाठतो, याची उत्तरे ‘क्रिटिक-प्रूफ’ या संकल्पनेत आहेत. हॉलीवूडच्या जेम्स कॅमेरॉन, स्टीवन स्पीलबर्ग, क्वेन्टीन टेरेन्टीनो या महारथींच्या नावांमध्येच इतकी पुण्याई आहे, की त्यांचे चित्रपट दाखल झाल्यानंतर प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञमताची आवश्यकता वाटत नाही. पण अलीकडच्या काळात मनोरंजनाचे पारंपरिक पर्याय विस्तारल्यानंतर ‘क्रिटिक-प्रूफ’ ही संकल्पना छोटा पडदा गाजणाऱ्या मालिका आणि परिपूर्ण अशा प्रसिद्धीतंत्राने सिद्ध झालेल्या गुणवंत चित्रपटांच्या बाबतही लागू पडत आहे.

विल्यम ब्रूस कॅमेरॉन या लेखकाच्या ‘ए डॉग्ज पर्पज’, ‘डॉग्ज वे होम’ आणि ‘ए डॉग्ज जर्नी’ या स्मार्ट कुत्र्यांवरच्या कादंबऱ्यांनी पुस्तकविक्रीचे विक्रम मोडले आहेत. अन् त्यावरच्या चित्रपटांनी गेल्या चार वर्षांमध्ये पुस्तक, श्वानउद्योग वाढवून दाखवत तिकीटबारी काबीज करण्याची किमयाही केली आहे. या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये श्वान निवेदकाच्या तोंडून समांतर मानवी कुटुंबाचा तपशील दाखविण्यात आला आहे. अन् त्यावर आलेल्या चित्रपटांच्या कथानकात भावनांचा सरधोपट आलेख, योगायोगाची ठिकाणे, चहाच्या पेल्यात मावण्यापलीकडे नसलेली अगदी छोटीच वादळे, प्रेक्षकांना अपेक्षित असलेल्या खेळकर शेवटाची भेट देतानाही त्यांच्या डोळ्यांत चटकन आनंदाश्रू तरळतील अशा दृश्य-वाक्य-संगीताचा अचूक मारा यांचे समीकरण जुळवण्यात आले आहे.

पुस्तक मालिकेतला ‘ए डॉग्ज जर्नी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी आला असून त्याने बडय़ा कलाकारांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही लाजवेल, इतका व्यवसाय ‘क्रिटिक-प्रूफ’ या आपल्या वैशिष्टय़ामुळे करून दाखविला आहे. ‘मॉडर्न फॅमिली’सह शेकडो अमेरिकी टीव्ही मालिकांची दिग्दर्शिका म्हणून लोकप्रिय असलेल्या गेल मॅनक्यूसो यांनी ‘ए डॉग्ज पर्पज’च्या सिक्वेलचा डोलारा अत्यंत कौशल्याने सांभाळला आहे.

अमेरिकी कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, प्रेम या सगळ्यांचे श्वानाच्या सोज्ज्वळ नजरेतून चित्रीकरण ही या (कादंबरी आणि) चित्रपटांमधील सर्वाना आवडणारी बाब आहे. पुनर्जन्म घेतल्यानंतरही आपल्या मालकाप्रति एकनिष्ठ राहिलेल्या आणि त्याचा आनंद हा आपल्या आयुष्याचे ध्येय ठेवणाऱ्या श्वानाची ही कहाणी आहे. साठोत्तरी दशकात कुटुंब संस्थेशी फारकत घेण्यास सुरुवात झालेल्या पिढीपासून ते आज अतिव्यक्तीवादी विचारसरणी बनलेल्या समाजाला ती श्वान नजरेतून दाखविते.

चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शेवटी अनेक जन्मांनंतरही आपल्या मूळ मालकाला शोधून काढणारा बेली हा सेंट बर्नार्ड जातीचा कुत्रा ‘ए डॉग्ज जर्नी’च्या आरंभी म्हातारा झालेला दिसतो. त्याच्या मालकाच्या म्हणजेच इथनच्या (डेनीस क्वेड) कुटुंबात सीजे ही त्याची नात नवी सदस्य म्हणून दाखल झालेली असते. या लहानग्या सीजेशी खेळणे आणि तिचे सगळ्या संकटांपासून रक्षण करणे, हे नवे ध्येय इथनने बेलीसमोर आखून दिलेले असते. ते तो उत्तमरीत्या पार पाडत असतो. मात्र नवऱ्याचे निधन झाल्यामुळे काही काळासाठी त्या आडगावात राहायला आलेली सीजेची आई ग्लोरिया (बेट्टी गिल्पिन) सीजेला घेऊन शहरात निघून जाते. बेलीच्या आयुष्याचे महत्त्वाचे बनलेले उद्दिष्ट संपुष्टात येते. सीजेच्या विरहाने झुरत त्याचे निधन होते आणि पुढला जन्म सीजेच्या शहरानजीक बीगल जातीच्या कुत्रीच्या रूपात होतो. मॉली नावाची ही कुत्री सीजेला शोधून काढते. सीजे आपल्या स्वार्थी आईने लादलेला एकटेपणा टाळण्यासाठी या कुत्रीशी मैत्री करते. त्यामुळे सीजे आणि मॉली या दोघांच्या आयुष्यात काही वर्षांसाठी अमर्याद आनंद निर्माण होतो. सीजेचा तारुण्यात प्रवेश होईस्तोवर ही कुत्री तिच्यासोबत राहते. एका अपघातामध्ये मॉलीचा मृत्यू होतो. मग पुढला जन्म इंग्लिश मॅस्टिफ जातीच्या कुत्र्यात होतो. बीग डॉग नावाचा हा आवाढव्य कुत्रा इथनच्या कुटुंबापासून ते आपल्या गतजन्मातील सीजेच्या स्मृतींमध्ये जगत असतो. सीजेशी त्याची आयुष्यभरात एकदाच ओझरती भेट होते. मात्र यॉर्कशायर टेरियर जातीत पुढचा जन्म घेतलेल्या मॅक्स नावाचे छोटुकले कुत्रे पुन्हा सीजेच्या जवळ जाण्यात यशस्वी होते. तिच्या आयुष्यातील अवघड प्रसंग पार पाडण्यासाठी सज्ज होते.

एका पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत चालणारी ही श्वान इमानाची गोष्ट दिग्दर्शिका गेल मॅनक्यूसो यांनी उत्तमरीत्या रंगविली आहे. मूळ कादंबरीमधील भावूक वर्णनांचा तपशील पडद्यावरही तितक्याच ताकदीने समोर आला आहे. अन् यातील उपकथानकांमधून अमेरिकी कुटुंबव्यवस्थेचे श्वानसहवासामुळे तयार झालेले सुखचित्र दाखविण्याचे प्रयोजनही पूर्ण झाले आहे. धोपट आणि ज्ञात कथावळणांपासून आक्षेप घ्याव्यात अशा योगायोगांच्या मालिका यात अनेक आहेत. तरी त्याकडे दुर्लक्ष करून कुटुंबासमवेत पाहावा इतक्या स्वच्छ-निखळ मनोरंजनासाठी ‘ए डॉग्ज जर्नी’इतका चांगला पर्याय या महिन्यात तरी दुसरा नाही.