11 December 2017

News Flash

भीती सुपर ‘इट’

भयपटही तिकीटबारीवर कमाईचा मोठा आकडा पार करून जातायेत..

रेश्मा राईकवार, मुंबई | Updated: September 17, 2017 2:58 AM

बॉलीवुडचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊन धडाधड कोसळत असताना गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला अ‍ॅंडी म्युकिएती दिग्दर्शित ‘इट’ हा चित्रपट जगभरातील तिकीटबारीवर धुमाकूळ घालतो आहे. इथेही या चित्रपटाने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जगभरातून या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या तीन दिवसांत ११५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली’ आणि ‘दंगल’ या चित्रपटांच्या सर्वाधिक कमाईचे विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. स्टीफन किंग यांच्या १९८६ साली आलेल्या कादंबरीवरचा ‘इट’ हा सर्वसामान्य भयपटांपेक्षा वेगळा आहे त्यामुळेच सध्या चित्रपट प्रचंड यश मिळवतोय हे खरं असलं तरी आपल्याकडे भयपटांना मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षकवर्ग आहे. पण या वर्गाच्या पदरी बॉलीवुडकडून निराशाच पदरी पडली असल्याने हॉलीवुडच्या सुपरहिरो फ्रँचाईजी चित्रपटांप्रमाणेच तिथले भयपटही तिकीटबारीवर कमाईचा मोठा आकडा पार करून जातायेत..

रामसे ब्रदर्सच्या भूतपटानंतर रामगोपाल वर्मा, विक्रम भटसारख्या एक-दोन दिग्दर्शकांनीच भय किंवा भूतपट निर्मितीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचेही काही चित्रपट वगळता अन्य चित्रपटांनी कमाई केली असली तरी त्यांना खूप यश मिळाले असे म्हणता येणार नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ओळीने इथे प्रदर्शित झालेल्या हॉलीवुडी भयपटांनी चांगली कमाई केली आहे. ‘इट’च्या आधी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनाबेले क्रिएशन’ या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘कॉन्ज्युअरिंग २’ हा आपल्याक डेही सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. ‘इट’ बरोबर अर्जुन रामपालची मुख्य भूमिका असलेला ‘डॅडी’ आणि श्रेयस तळपदे दिग्दर्शित देओल बंधूंचा ‘पोश्टर बॉईज’ असे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र ‘डॅडी’ जेमतेम आठ कोटींपर्यंत पोहोचला तर पोश्टर बॉईजही पाच-साडेपाच कोटींच्या आसपास आहे. या पाश्र्वभूमीवर ‘इट’ आणि ‘अ‍ॅनाबेले क्रिएशन’ला मिळालेले यश नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखे नाही. ‘इट’ हा चित्रपट वेगळा आहेच. मुळात स्टीफन किं गची ‘इट’ ही कादंबरी भयंकर लोकप्रिय आहे. जगभरात टॉपच्या दोन ते तीन क्रमांकावर ही कादंबरी आहे. अजूनही बेस्टसेलर असलेली ही कादंबरी आपल्याकडेही अनेकांनी वाचलेली आहे. अनेकजण त्याचे चाहते आहेत. त्यामुळे ते जगभरात सगळीकडेच या कादंबरीचे चाहते चित्रपटाकडे वळणार हे साहजिकच होते, असे चित्रपट अभ्यासक-समीक्षक गणेश मतकरी यांनी सांगितले. पण ‘इट’ची सर्वसामान्य भयपटांच्या चौकटीपलिकडची मांडणी हेही त्याच्या यशाची महत्वाची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘इट’मध्ये एक विदूषक आहे जो खून करतो आहे. आणि सात मुलं आहेत. या सात मुलांच्या जाणिवा-त्यांच्या भावभावनाच भीतीच्या रुपाने त्यांच्यासमोर प्रकट होतात. उदाहरण द्यायचं झालं तर या सात मुलांमध्ये एक मुलगी आहे. तिचं मुलगी असणं हीच तिची भीती आहे. स्त्रीत्वाच्या जाणिवेबरोबर येणाऱ्या ज्या भीती-शंका आहेत त्याच तिच्यासमोर भीती म्हणून उभ्या ठाकतात, अशाप्रकारची ही कथा आहे. त्यामुळे चित्रपटात कुठलंही भूत किंवा तत्सम आवाज वगैरे न वापरता कथेतूनच भीती निर्माण केली गेली आहे. व्यक्तीच्या सुप्त मनातील भावभावनांना हात घालून ती भीती निर्माण केली गेली आहे. आपल्याकडे असा आशय असणारे चित्रपट कधीच नव्हते त्यामुळे भयपटांना प्रेक्षकवर्ग असूनही असं चित्र आपल्याकडे कधीच पहायला मिळत नाही, असं त्यांनी सांगितलं. भयपट म्हटले की आपल्याकडे अजूनही रामगोपाल वर्माच्या चित्रपटांची यादी पहिले समोर येते. त्यापाठोपाठ मग दिग्दर्शक विक्रम भट्टने केलेले ‘राझ’सारख्या चित्रपटांची मालिका यांचा उल्लेख येतो. तुलनेने या चित्रपटांनी वीस कोटींपेक्षा जास्त कमाई करत या जॉनरला बरे दिवस मिळवून दिले होते. पण ‘अ‍ॅनाबेले क्रिएशन’ असेल किंवा ६१ कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा ‘कॉन्ज्युअरिंग २’ आहे. अगदी २०१३ साली ‘कॉन्ज्युअरिंग’ प्रदर्शित झाला होता. त्यानेही त्यावेळी २२.७६ कोटींची कमाई केली होती. मराठीत हल्लीच प्रदर्शित झालेला ‘लपाछुपी’ हा चांगला भयपट होता. तो वगळता ‘राझ’ किंवा तत्सम चित्रपट हे हॉलीवुडच्या ‘एक्सॉर्सिस्ट’च्या वेगवेगळ्या आवृत्या आहेत. आपल्याकडच्या भयपटांकडे कित्येकदा ठोस कथाच नसते. एखादीच कथा घेऊन त्यातील भीती वाढत जावी म्हणून ती ज्याप्रकारे विकसित करायला हवी ते केलं जात नाही. त्याउलट, त्यात आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींची भर घालत भरकटण्याची दिग्दर्शकांची सवय असते. आणि म्हणून ते भयपट फसतात, असे मतकरी यांनी स्पष्ट केले. ‘हाँटेड हाऊस’ (थ्रीडी), ‘१९२० लंडन’, रामगोपाल वर्माचा ‘भूत’ , ‘डरना जरूरी है’ वगैरे चित्रपट सोडले तर अजूनही भयपटांना आपल्याकडे फारसा हात घातला जात नाही. त्यामुळे भयपट म्हटले की आपल्याकडच्या प्रेक्षकांनाही बऱ्याच अंशी हॉलीवुडपटांवर अवलंबून रहावं लागतं. सतत फसणाऱ्या चित्रपटांमुळे विक्रम भट्टनेही सध्या भयपट करणे थांबवले आहे. त्यामुळे एकीकडे बॉलीवुडमध्ये असलेली भयपटांची वानव हॉलीवुडपटांच्या पथ्यावर पडली आहे हे वास्तव आहे. शिवाय, ‘इट’ सारखा चित्रपट आपल्याकडेही इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा चार भाषेत प्रदर्शित झाला असल्याने साहजिकच मोठा प्रेक्षकवर्ग तो पाहणार. हेही या चित्रपटाच्या यशामागचे मोठे कारण आहे. पण बॉलीवुडमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाही प्रसंगी त्यांना बाजूला करून प्रेक्षकांनी या भयपटांना जवळ सध्या तिकीटबारीवर भीतीच सुपर‘इट’ ठरली आहे यात शंका नाही.

First Published on September 17, 2017 2:58 am

Web Title: hollywood movies superhit performance in india