बॉलीवूडपट आणि प्रादेशिक पटांची मक्तेदारी मोडता आली नाही तरी हॉलीवूड चित्रपट पाहणाऱ्या भारतीयांचा टक्का वाढतो आहे हे हॉलीवूडच्या मुख्य स्टुडिओजच्या लक्षात आले आहे. हॉलीवूड चित्रपट आणि मालिका पाहण्याकडे भारतीय प्रेक्षकांचा कल वाढत असल्यानेच या स्टुडिओजना भारतीय बाजारपेठेत आत्तापर्यंत १० टक्क्यांनी का होईना आपली उपस्थिती नोंदवता आली आहे.
२०१४ मध्ये ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’चे दहा हॉलीवूडपट भारतात प्रदर्शित झाले होते. या सगळ्याच चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली. त्यामुळे खास भारतीय प्रेक्षकांसाठी आपले दोन ऑस्कर नामांकित चित्रपट भारतात पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ने घेतला आहे.
हॉलीवूडमध्ये ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’, ‘पॅरामाउंट’, ‘वॉर्नर ब्रदर्स’, ‘माव्‍‌र्हल स्टुडिओज’सारख्या चित्रपटनिर्मिती संस्थांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. त्यातल्या त्यात आत्तापर्यंत ‘पॅरामाउंट पिक्चर्स’, ‘माव्‍‌र्हल स्टुडिओ’ आणि ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’च्या चित्रपटांना भारतात सर्वाधिक कमाई करता आली आहे. मात्र, या वर्षी भारतात प्रदर्शित झालेल्या आपल्या दहाही चित्रपटांना तिकीटबारीवर चांगली कमाई करता आली असल्याचा दावा ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ने केला आहे.
या वर्षी ‘एक्समेन : डेज ऑफ फ्यूचर पास्ट’, ‘डॉन ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’, ‘हाऊ टु ट्रेन युवर ड्रॅगन २’, ‘एक्सॉडस’, ‘रिओ २’, ‘गॉन गर्ल’, ‘पेंग्विन्स ऑफ मादागास्कर’, ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’, ‘मेझ रनर’ आणि ‘नाइट अ‍ॅट द म्युझियम ३’ असे फॉक्सचे दहा चित्रपट हॉलीवूडमध्ये प्रदर्शित झाले होते. या सर्व चित्रपटांनी भारतात चांगली कमाई केली असल्याने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले फॉक्सचे दोन ऑस्कर नामांकित चित्रपट भारतात पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
‘बर्डमन’ आणि ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ या फॉक्सच्या दोन चित्रपटांना सर्वाधिक ‘ऑस्कर’ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ‘बर्डमन’ आता सध्या चित्रपटगृहांमधून दाखवला जातो आहे. मात्र, ‘गॉन गर्ल’ आणि ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ हे फॉक्सचे दोन हॉलीवूडपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाले होते. ऑस्कर नामांकनांच्या निमित्ताने भारतीय प्रेक्षकांसाठी हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे फॉक्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.
२०१३ मध्ये भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडपटांनी ३२३ कोटींची उलाढाल केली होती. त्यानंतर यात सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी हॉलीवूडपट प्रदर्शित करणाऱ्या भारतीय चित्रपटगृहांच्या संख्येतही वाढ होत असून त्याचाच फायदा घेत हॉलीवूडच्या या मुख्य चित्रपटनिर्मिती संस्थांनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे.
आत्तापर्यंत फॉक्सचे ‘अवतार’, ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटांसह ‘एक्समेन’ आणि ‘आइसएज’ चित्रपटमालिकांनी भारतात चांगले यश मिळवले आहे. तर २०१४ मध्ये पॅरामाउंटच्या ‘ट्रान्सफॉर्मर्स : एज ऑफ एक्सटेन्शन’ आणि ‘इन्टरस्टेलर’ या दोन चित्रपटांना चांगली कमाई करता आली.