विद्या बालनच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘कहानी’ चित्रपटाचा हॉलीवूड रिमेक करण्याचा घाट यशराज प्रॉडक्शनने घातला आहे. ‘द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू’ या हॉलीवूडपटाचा दिग्दर्शक नील्स आर्डेन आप्लेव्ह ‘कहानी’च्या हॉलीवूड आवृत्तीचे दिग्दर्शन करणार असून चित्रपटाचे नाव ‘डेईटी’ असे असणार आहे.  ‘द मोटारसायकल डायरीज’ या गाजलेल्या स्पॅनिश चित्रपटाची लेखिका जोस रिव्हेरा आणि ‘तेहरान’चा लेखक रिचर्ड रेगन यांनी सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी’ चित्रपट हॉलीवूडपटासाठी घेतला होता. आता या दोघांनी मिळून पाश्चिमात्य देशांमध्ये असलेल्या परिस्थितीला अनुसरून नव्याने ‘कहानी’ लिहिला आहे. आता नील्स हा चित्रपट कसा दिग्दर्शित करतो आहे, याबद्दल उत्सुकता असल्याचे सुजॉयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आदित्य चोप्राने कधीतरी ‘कहानी’ हा जगभरातील प्रेक्षकांसाठी बनवायचा आहे, असे म्हटले होते. त्यावेळी तो काहीतरी बोलून गेला असेल, असे वाटले होते. मात्र, तो जसे बोलला तसे त्याने केले असून ‘कहानी’च्या हॉलीवूड रिमेकसाठी यशराज प्रॉडक्शनकडून हरएक प्रयत्न केले जात आहेत, अशा शब्दांत सुजॉयने त्यांचे कौतुक केले आहे.
नव्या ‘कहानी’त एका अमेरिकन महिलेचा आपल्या पतीच्या शोधात कोलकत्त्यापर्यंत झालेला प्रवास आणि तिच्याभोवती रचला गेलेला सापळा अशी कथा रचण्यात आली आहे. यावर्षीच्या कान महोत्सवात निकोल किडमनची मुख्य भूमिका असलेल्या ‘ग्रेस ऑफ मोनॅको’ या चित्रपटाच्या सहनिर्मितीत भाग घेऊन यशराजने हॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. ‘कहानी’ म्हणजेच ‘डेईटी’ हा त्यांचा दुसरा हॉलीवूडपट ठरणार असून यशराजच्या हॉलीवूडपटांची जबाबदारी ही उदय चोप्राने उचलली आहे.