X
X

Video :अमिताभसह ११ कलाकारांनी आपापल्या घरातून केलं ‘या’ शॉर्टफिल्ममध्ये काम

READ IN APP

या लघुपटात दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे

जगभरात पाय पसरलेल्या करोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत अनेक जण करोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या सूचनाही करण्यात येत आहे. यात कलाकार मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचं काम करत आहे. विशेष म्हणजे ही कलाकार मंडळी आता एकत्र आली असून एका लघुपटाच्या (शॉर्टफिल्म) माध्यमातून ते जनजागृती करत आहेत.

कलाकारांनी तयार केलेल्या या शॉर्टफिल्मचं नाव ‘फॅमिली’ असं असून प्रसून पांडे यांच्या कल्पनेमधून ही शॉर्टफिल्म तयार झाली आहे. या फिल्मचं वैशिष्ट म्हणजे यात दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेक सेलिब्रिटी झळकले आहेत. इतकंच नाही तर ही कलाकार मंडळी या फिल्मसाठी एकमेकांना भेटली नसून त्यांनी त्यांच्याच घरी राहून या फिल्ममध्ये सहभाग घेतला आहे. मात्र ही फिल्म पाहिल्यानंतर या कलाकारांनी एकमेकांपासून दूर राहून हे चित्रीकरण केलंय यावर विश्वास बसणार नाही.

या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून जनतेला लॉकडाउनचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे. तसंच घरात राहणं किती गरजेचं आहे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी जनजागृती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शॉर्टफिल्ममधून होणाऱ्या कमाईतून गरजूंना शिधा पुरविण्यात येणार आहे.

दरम्यान, या शॉर्टफिल्ममध्ये चिरंजीवी,अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, मोहनलाल मामुटी, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, सोनाली कुलकर्णी आणि दिलजीत दोसांज ही कलाकार मंडळी झळकली आहेत.

 

23
X