‘कॉकटेल’नंतर दिग्दर्शक होमी अदजानियाचा दुसरा चित्रपट कोणता असणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्यात ‘फाइंडिंग फॅनी’ असं विचित्र नाव, मग दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर अशी वेगळी जोडी आणि नासिर, डिम्पल, पंकज कपूर यांच्यासारखे कलाकार यामुळे या चित्रपटाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एवढे की या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून २४ तासाच्या आत दहा लाख हिट्स मिळाले आहेत. एवढी उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट आपण केवळ ३६ दिवसांत पूर्ण केल्याची माहिती दिग्दर्शक होमीने दिली आहे.
‘मला स्वत:ला हा चित्रपट खूप आवडला आहे’, असे होमीने म्हटले आहे. होमीने याआधी ‘कॉकटेल’ दीपिकाबरोबर केला होता. या चित्रपटाची कथा दीपिकाला ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या आधी आणि अर्जुनला ‘२ स्टेट्स’च्या आधी ऐकवली होती. दोघांनाही कथा आवडली होती, पटली होती त्यामुळे त्यांचा एका दमात होकार मिळाला, असे त्याने सांगितले. तर डिम्पलनेही ‘कॉकटेल’मध्ये सैफच्या आईची भूमिका केली होती. डिम्पलशिवाय हा चित्रपट करणे शक्यच नव्हते. नाहीतर आपल्याला मार खावा लागला असता असे सांगणाऱ्या होमीने नसिरूद्दीन शहांची व्यक्तिरेखा खास त्यांच्यासाठीच लिहिलेली होती, अशी माहिती दिली.
या चित्रपटात आपल्याला आश्चर्याचा धक्का मिळाला तो पंकज कपूर यांच्याकडून असे होमीचे म्हणणे आहे. चित्रपटाची कथाच इतकी भन्नाट आहे. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखाही तशाच अवली आहेत. त्यात या व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी दीपिका, अर्जुन, नासिर, डिम्पल आणि पंकज अशा एकसो एक कलाकारांची साथ मिळालेली असल्याने ‘फाइंडिंग फॅनी’चे चित्रिकरण हाच एक अजब अनुभव होता, असे होमीने सांगितले. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असे ३६ दिवसांत चित्रिकरण पूर्ण केले असून संपूर्ण वेगळी संस्कृती, भाषा आणि कथा घेऊन आलेला हा आजवरचा वेगळा चित्रपट असल्याचे मत होमीने व्यक्त केले आहे.