News Flash

सिनेमा आणि समलैंगिकता

‘सिटी ऑफ ड्रीम्स’या वेब सीरिजमधील प्रिया बापट आणि गीतिका त्यागी या दोघींच्या बोल्ड दृश्यावरून चर्चा रंगली आहे.

|| स्वप्निल घंगाळे

‘सिटी ऑफ ड्रीम्स’या वेब सीरिजमधील प्रिया बापट आणि गीतिका त्यागी या दोघींच्या बोल्ड दृश्यावरून चर्चा रंगली आहे. अनेकांनी हे दृश्य कथेची गरज होती आणि ते उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे इतक्या पुढच्या स्तरावर जाण्याची मराठी अभिनेत्रीला गरज नव्हती, असेही काही जणांचे म्हणणे आहे. मात्र अशाप्रकारे समलैंगिक संबंधांना वेबसीरिज किंवा मोठय़ा पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याच पाश्र्वभूमीवर समलैंगिक संबंधांवर आधारित सिनेमे आणि वेबसीरिजवर टाकलेली नजर..

वेबसीरिज हे एक प्रभावी माध्यम म्हणून समोर आले असून सेन्सॉरशिपची कठोर बंधने नसल्याने वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक विषय अधिक खुलेपणाने प्रेक्षकांसमोर मांडले जात आहेत. त्यातही समलैंगिक असणे हा कायद्याने गुन्हा ठरवणाऱ्या ३७७ कलमासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर समलैंगिकतेवर वेबसीरिजमधून अधिक मोकळेपणे भाष्य केले जात आहे. ‘सेक्रेड गेम्स’, ‘इमोशनल अत्याचार’, ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’, ‘इनसाइड एज’, ‘मेड इन हेवन्स’, ‘एमटीव्ही बीग एफ’ यासारख्या वेबसीरिजच्या माध्यमातून समलैंगिकतेवर वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य केले गेले आहे.

चित्रपटांमधूनही समलैंगिकतेवर अनेकदा भाष्य करण्यात आले आहे. समलैंगिकता आणि बॉलीवूड असा विचार केल्यानंतर डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे १९९६ साली प्रदर्शित झालेला ‘फायर’ हा चित्रपट. दीपा मेहता दिग्दर्शित हा चित्रपट खरोखरच काळाच्या पुढे होता. समलैंगिकता या शब्दाचा वापरही सर्वसामान्यांकडून फारसा केला जात नव्हता त्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला. नंदिता दास आणि शबाना आझमी यांच्या तगडय़ा अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिला.

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘गर्लफ्रेण्ड’ या चित्रपटात दोन मुलींमधील समलैंगिक संबंधांवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटावरूनही बराच वाद झाला होता. अगदी या चित्रपटाचे पोस्टर्स आणि बॅनर्स फाडण्यापासून ते त्यावर बंदी घालण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. ‘माय ब्रदर निखिल’ हा चित्रपट जरी २००५ या वर्षी प्रदर्शित झाला असला तरी त्याचे कथानक १९८६ ते १९९४ सालातील होते. ज्या काळात एड्स आणि समलैंगिकतेबद्दल बोललेही जात नव्हते त्या काळात या दोन्ही प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या निखिल (संजय सुरी) आणि त्याचा प्रियकर नीगल (पुरब कोहली) आणि निखिलची बहीण अनामिका (जुही चावला) यांची ही कथा ओनीर दिग्दर्शित या चित्रपटात होती.

जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘दोस्ताना’ (२००८) हा समलैंगिकतेवर भाष्य करणारा मुख्य प्रवाहातला पहिला बिग बजेट चित्रपट ठरला. हलक्याफुलक्या आणि गमतीदार पद्धतीने मांडणी करण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये किरण खेर यांच्या माध्यमातून समलैंगिकतेसंदर्भात भारतीय पालक कशा पद्धतीने टोकाचा प्रतिसाद देतात हे मांडण्यात आले होते. २००८ साली प्रदर्शित झालेला मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ हा चित्रपट प्रियांकाने साकारलेल्या मेघना माथुर या मॉडेलची कथा होती. तर यात समीर सोनीने साकारलेली गे फॅशन डिझायनरची भूमिका आणि त्याची छोटी कथा अनेक अर्थांनी त्या काळातील समलैंगिकतेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर भाष्य करणारी होती.

‘बॉम्बे टॉकीज’ या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आगळ्यावेगळ्या चित्रपटामधील एक कथा समलैंगिकतेवर भाष्य करणारी होती. करण जोहर दिग्दर्शित ‘अजीब दास्तान हैं ये’ या शॉर्ट स्टोरीमध्ये समलैंगिक असल्याचे सांगत स्वत:चे घर सोडून जाणाऱ्या अविनाशची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मार्गारीटा विथ अ स्ट्रॉ’ हा चित्रपटही समलैंगिकतेवर आधारित होता. कल्की कोचलीनने यात मुख्य भूमिका साकारली होती. सेलेब्रल पाल्सीचा आजार झालेली कल्की एकाच वेळी एका अंध मुलीच्या आणि एका तरुणाच्या प्रेमात पडते तेव्हा तिला तिच्या उभयलैंगिकतेबद्दल (बायसेक्सुअ‍ॅलिटी) समजते आणि यातून चित्रपट पुढे उलगडतो. मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव हे दोन तगडे कलाकार असलेला आणि समलैंगिकतेवरील सत्य घटनेवर आधारित आणखीन एक चित्रपट म्हणजे ‘अलिगढ’. अलिगढ विद्यापीठातील एका प्राध्यापकाची तो समलैंगिक असल्याने हकालपट्टी केली जाते आणि त्यानंतर होणारा संघर्ष चित्रपटात चित्रित करण्यात आला होता. हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटावरूनही बरेच वाद झाले, मात्र कलाकारांच्या अभिनयासाठी या चित्रपटाची चांगली चर्चा झाली होती. ‘पद्मावत’ या चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला अलाउद्दीन खिलजी हाही उभयलैंगिक दाखविण्यात आला होता, तर अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘एक लडकी को देखा तो ऐसे लगा’ हा चित्रपटही समलैंगिक संबंधांमुळे स्वत:मध्ये अडकून पडलेल्या मुलीची कथा सांगणाराच आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने समलैंगिकतेचा विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. याशिवाय ‘क्या कूल हैं हम’ (२००५), ‘हनिमून ट्रॅव्हल्स’ (२००८), ‘स्ट्रेट’ (२००९), ‘आय एम’ (२०१०), ‘देढ इश्किया’ (२०१४), ‘अनफ्रीडम’ (२०१४), ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ (२०१६) या चित्रपटांतूनही समलैंगिकतेच्या मुद्दय़ांना स्पर्श करण्यात आला आहे.

समलैंगिकतेला समाजामध्ये मान्यता मिळवून देण्यात चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय कमी अधिक प्रमाणात प्रभावीपणे मांडणाऱ्या कलाकारांचा, दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा मोलाचा वाटा आहे हे सत्य नाकारता येणार नाही. आज एका चुंबन दृश्यावरून प्रेक्षकांमध्ये दोन गट पडले असले तरी समलैंगिकतेसारख्या संवेदनशील विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यामागे या समुदायातील लोकांच्या लढय़ाबरोबर मनोरंजनसृष्टीचाही खारीचा का असेना पण वाटा आहे. मोठय़ा पडद्यावरून समलैंगिक व्यक्तींचा संघर्ष आणि त्यांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी मांडण्याची हिंमत करण्याबरोबर प्रेक्षकांनाही त्या कलाकृतींचा स्वीकार केल्यानेच कलम ३७७ संदर्भातील निकाल आल्यानंतर तरुणाईने त्याचे जोशात स्वागत केले होते. काळानुसार समलैंगिक संबंध तरुण पिढीने सहजतेने आपलेसे केले आहेत, याचेही प्रतिबिंब अलीकडे प्रदर्शित झालेल्या काही वेबसीरिजमधून पाहायला मिळते आहे. ‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजमधील मुख्य नायकाची समलैंगिक असल्यामुळे झालेली कुतरओढ, आईवडिलांनी हे वास्तव स्वीकारले नाही तर होणारी ससेहोलपट, समाजापासून आपले वास्तव न लपवता जगले तर येणाऱ्या अडचणी आणि त्याचवेळी समवयस्कांकडून मिळणारे प्रेम, मैत्रीचा आधार या सगळ्याचे चित्रण या वेबसीरिजमध्ये करण्यात आले आहे.

अर्थात आपल्या समाजात आणि एकूणच भारतीय मानसिकतेचा विचार केला तर हा विषय पचनी पडणे आणि स्वीकारणे अजूनही तसे अवघडच आहे. चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून समलैंगिक संबंधांविषयीचे गैरसमज तरी दूर होण्यास मदत झाली तर समाजासाठी तो एक मोठा बदल ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 1:07 am

Web Title: homosexuality in bollywood movie
Next Stories
1 चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल..
2 ट्रान्स अफेअर वेगळ्या लिंगभावाची वेदना
3 हायस्कूलमधले प्रेमशिक्षण
Just Now!
X