बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं असून दिल्लीतील न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे.

पत्नी शालिनी तलवारीने हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला २८ ऑगस्ट पूर्वी उत्तर देण्यास आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हनी सिंगने दोघांच्या (पतिपत्नी यांची संयुक्त मालकी असलेली संपत्ती) नावावर असलेली मालमत्ता विकली आणि इतकंच नाही तर त्याने मानसिक छळ केल्याचा आरोप शालिनीने तक्रारीमध्ये केला आहे.

शालिनीने तक्रारीमध्ये हनी सिंगवर इतरही काही गंभीर आरोप केले आहेत. हनी सिंगने मानसिक छळाबरोबर आपला शारीरिक छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. शालिनीने हनी सिंगबरोबरच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले आहेत. शालिनीने न्यायालयाला विनंती केली की, तिच्या आणि हनी सिंगच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात यावी.

हनी सिंग आणि शालिनी यांनी २०११मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते एकमेकांना जवळपास २० वर्षे ओळखत होते. त्यांनी दिल्ली येथील फार्म हाऊसवर लग्न केले होते. पण त्यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती होते. काही दिवसांपूर्वी हनी सिंगचे नाव अभिनेत्री डियाना उप्पलशी जोडले गेलं होतं. पण या सर्व अफवा असल्याचे नंतर हनी सिंगने स्पष्ट केले.