गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस १४’फेम अभिनेत्री पवित्रा पुनिया सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. मात्र, आता एका हॉटेल व्यावसायिकाने पवित्रा त्याची पत्नी असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे पवित्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

हॉटेल व्यावसायिक सुमित माहेश्वरी यांनी पवित्रा त्यांची पत्नी असल्याचा दावा केला आहे. सोबतच पवित्राने मला अनेकदा माझी फसवणूक केल्याचंदेखील म्हटलं आहे. एका युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत सुमित यांनी हा दावा केला आहे.

“मी आणि पवित्रा अजूनही एकमेकांचे पती-पत्नी आहोत. आमचं लग्न झालं आहे. मात्र, याविषयीचा आम्ही कुठेच खुलासा केला नाही. खरं तर आम्ही ही गोष्ट का लपवून ठेवली याचं उत्तर पवित्रा चांगल्या पद्धतीने देऊ शकेल. पारस छाबडाने अलिकडेच पवित्राचं लग्न झाल्याचा खुलासा केला होता. यावेळी पवित्राच्या पतीने मला मेसेज करुन याविषयीची कल्पना दिल्याचं तो म्हणाला होता. तर हो. पारस म्हणतोय ते बरोबर आहे. मीच पारसला मेसेज करुन पवित्राचं माझ्यासोबत लग्न झालं आहे असं सांगितलं होतं. तसंच जर तुम्ही दोघं रिलेशनशीपमध्ये असाल तर मला पवित्रापासून घटस्फोट घेऊ दे असं मी त्याला सांगितलं होतं”, असं सुमित माहेश्वरी यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी आपल्या लग्नाविषयी कोणाला सांगू नकोस असं वचन पवित्राने घेतलं होतं. तसंच तिथे गेल्यानंतर ती कोणासोबतही अफेअर करणार नाही हेदेखील तिने सांगितलं होतं. मात्र, आता परत ती पहिल्यासारखीच वागत आहे. हे पाहून मला खरंच वाईट वाटतंय. चौथ्यांदा ती मला परत फसवत आहे. माझ्यासोबत लग्न झालेलं असतानादेखील तिने आतापर्यंत चार अफेअर्स केले आहेत. पहिला पारस, दुसरा प्रतिक, तिसऱ्याचं नाव ठावूक नाही आणि आता चौथा एजाज खान”.

दरम्यान, सुमित माहेश्वरी यांच्या या वक्तव्यानंतर छोट्या पडद्यावर चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. मात्र, यावर पवित्राने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.