News Flash

वेबवाला : मर्यादित चौकटीत, मर्यादित यश

नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘हाऊस अरेस्ट’ हा वेब चित्रपट त्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी ठरतो.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

केवळ २४-३६ तास एकाच घरात घडलेली घटना अशा कथासूत्रावर आधारित यापूर्वी काही चित्रपट येऊन गेले आहेत. चित्रीकरणास सोपे, खर्चात बचत करणारे कथानक अशी जरी रचना असली तरी अशा वेळी खरा कस लागतो तो लेखकाचा. मर्यादित पैसे उपलब्ध असताना एखाद्या गोष्टीच्या तळाशी पोहोचण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. कथेत लपलेले अनेक बारकावे अगदी तपशीलवार मांडावे लागतात. तेव्हाच प्रेक्षक त्या मर्यादित फ्रेममध्येदेखील गुंतून राहू शकतो. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘हाऊस अरेस्ट’ हा वेब चित्रपट त्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी ठरतो.

बँकिंग व्यवसायात यशस्वी ठरलेला करण हा अचानक नेहमीच्या सर्व घटनांपासून स्वत:ला दूर सारतो आणि त्याच्या घरात कोंडून घेतो. त्याचे कोंडून घेणे हे काही प्रमाणात नैराश्याचा भाग असले तरी तो त्या नैराश्यात कुढत न राहता त्या मर्यादित चौकटीत त्याचे स्वत:चे असे स्वतंत्र जग निर्माण करतो. अतिशय टापटिपीने, नेटकेपणाने राखलेले घर, पराकोटीची स्वच्छता आणि पराकोटीची शांततादेखील. अशा वातावरणात तो चक्क नऊ महिने त्याच्या घरातून बाहेरच पडत नाही. अगदी दाराबाहेरच्या पायपुसणीलादेखील स्पर्श करण्याचे टाळतो. त्याला लागणाऱ्या नियमित वस्तू आणि मदतीसाठी स्वत:ची अशी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करतो. घरातूनच शेअर बाजारावर व्यवहार आणि स्काइपच्या माध्यमातून सल्लागार बनून उदरनिर्वाहाची सोयदेखील करतो. त्याचे काही मित्र, नातेवाईक त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण तो बधत नाही. त्याच्याच इमारतीतील एक पिंकी नावाची मुलगी तिच्या डॉन वडिलांच्या जिवावर त्याला अधूनमधून लाडीक धमकवायचा प्रयत्न करते, तिला पण तो बधत नाही. या नऊ महिन्यांत त्याच्या जगण्यात मोठा बदल घडतो तो त्याची मुलाखत घ्यायला आलेल्या सायरा या पत्रकार मुलीमुळे. त्याच वेळी पिंकी त्याच्या घरात एका भल्या मोठय़ा सुटकेसमध्ये एका व्यक्तीस बांधून ठेवते. त्या सगळ्यातून एक धम्माल आणि रोमँटिक अशा घटना सुरू होतात.

जशी ही कथा एका मर्यादित चौकटीत घडते तशीच यातील पात्रेदेखील मर्यादितच आहेत. एवढय़ा सगळ्या मर्यादित रचनेत कथेत जीव ओतण्याचे काम त्यातील बारकाव्यांनी अधिक केले आहे. दिल्लीतील ठरावीक पद्धतीचे मोठे घर आणि त्याची मांडणी ही एखाद्या पात्राप्रमाणेच यामध्ये येते. किंबहुना करणचे विश्व त्यातून अधिक उलगडते. त्या घरातील अनेक बारीकसारीक तपशील हे आपल्याला एक पाश्र्वभूमी निर्माण करतात. त्यात एक प्रकारचा उंचीपणा तर आहेच, पण केवळ भपकेबाज न होता, निर्जीव न वाटता ते सारे जिवंत वाटत राहते.

घरातून बाहेरच न पडता जगणे हे खरे तरे अत्यंत कंटाळवाणे होऊ शकते. जगापासून सारे धागेदोरे तोडून जंगलात तपश्चर्येला जाणाऱ्या ऋषीमुनींबद्दल आपण ऐकले आहेच, पण त्यात एक प्रकारचा एकांतवास आणि जगाचा दुस्वासदेखील असतो. हाऊस अरेस्टमध्ये असे काहीच नाही. उलट करण अनेकांशी संवाद साधत असतो. मात्र नेहमीच्या रहाटगाडग्यात स्वत:ला जुंपून घेण्याचे टाळतो. त्यातून काही उदात्त किंवा तात्त्विक भाषण देण्याकडे त्याचा कल नसतो. किंबहुना तो त्याचे आयुष्य मस्तपैकी आनंदाने जगत असतो. आणि हे सर्व स्वखुशीने सुरू असते. दिग्दर्शक त्याची ही अवस्था पकडण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.

करणचे आयुष्य उलगडण्यासाठी पत्रकाराने घेतलेली मुलाखत हाच या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. पण तो पुरेसा यशस्वी ठरताना दिसत नाही. म्हणजे त्यात अनेक छोटय़ामोठय़ा बाबी येतात, पण त्यातून एक विस्तारित चित्र उभे राहत नाही. पत्रकाराची मुलाखत ही साचेबद्ध पद्धतीने नसावी हे जरी मान्य केले तरी ती अत्यंतच मर्यादितपणे येत राहते, त्यामुळे त्यातून माणूस उलगडण्यापेक्षा इतर बाबीच अधिक उलगडत जातात. मूळ कथेला जोड म्हणून आणि थोडा विरंगुळा म्हणून पिंकीची विनोदी कथाही त्यात घुसवली आहे. पण ती जोड आहे हे अगदी स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे मधल्या टप्प्यात थोडा अडथळादेखील जाणवतो. पण हा अडथळा मर्यादित ठेवल्यामुळे बोजड ठरत नाही. जोडीला थोडाफार मर्यादित सेक्सदेखील कथाकाराने आणला आहे, पण तो हल्ली जणू काही अपरिहार्य भागच असल्यासारखा झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलेलेच अधिक चांगले. कारण त्यामधून नेमके काय सांगायचे आहे हेच स्पष्ट होत नाही.

चित्रपटातील कलाकार हे प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. किंबहुना काही वेळा तर त्यांचा अभिनय कृत्रिम वाटतो. चित्रपटाची मांडणी जितकी सहज आहे, तितकी सहजता अभिनयात जाणवत नाही. अली फजल आणि श्रीया पिळगांवकर यांची करण आणि सायरा ही जोडी आश्वासक आहे, पण त्यांनी आणखीन परिश्रम घ्यायला हवे होते.

वेब चित्रपटांसाठी वेगळे कथानक यामध्ये नक्कीच चपखल असे हे कथानक आहे. मोजक्या खर्चात आणि तरीदेखील काही काळ तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी निर्मिती येथे दिसून येते. कोणताही बडेजाव नसणारे काही तरी पाहायचे असले आणि डोक्याला कसलाही ताण द्यायचा नसेल तर एकदा पाहायला हरकत नाही.

हाऊस अरेस्ट

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:22 am

Web Title: house arrest web movies review abn 97
Next Stories
1 भुताळी सहल..
2 ‘हुड हुड दबंग’ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मीम्स व्हायरल
3 इस्लामच्या प्रचारासाठी अभिनयाला अलविदा
Just Now!
X