हाऊसफुल्ल ४

‘हाऊसफुल्ल’ ही चित्रपट मालिकाच मुळी तर्क  खुंटीवर टांगून ठेवून पडद्यावर बडे कलाकार कथेच्या नावाखाली जो मूर्खपणा करतात, तो पाहून हसण्याचा खेळ. त्यामुळे या चित्रपटात किमान कथा असेल अशी अपेक्षाच नाही. पण डोके बाजूला ठेवूनही बघायचा ठरवला तरी निदान विनोदी चित्रपट आहे म्हटल्यावर किमान हसता यावे, ही माफक अपेक्षाही चित्रपट पूर्ण करत नाही. इतके मोठे कलाकार असूनही चित्रपट धड हसवतही नाही आणि धड मनोरंजनही करत नाही. त्यामुळे आता तरी के वळ तिकीटबारीवरची कमाई फुल्ल असल्यामुळे मूर्खपणाचा हा हाऊसफुल्ल खेळ थांबवायला हवा.

बिनडोक कथा आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या साजिद खानच्याच हातात या चित्रपटाची सूत्रे होती. त्यामुळे चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक म्हणून आता फरहाद सामजी यांचे नाव लागले असले तरी प्रभाव तोच कायम आहे. फरहादच्या हातात दिग्दर्शनाची धुरा आल्यानेही त्यात फार काही फरक पडलेला नाही. त्यातला बिनडोकपणा तसूभरही कमी झालेला नाही. लंडनमध्ये तीन तरुण हॅरी (अक्षय कुमार), मॅक्स (बॉबी देओल) आणि रॉकी (रितेश देशमुख) पैसे मिळवण्यासाठी गर्भश्रीमंत असलेल्या तीन तरुणींच्या प्रेमात पडल्याचे नाटक करताहेत. क्रिती (क्रिती सनन), पूजा (पूजा हेगडे) आणि नेहा (क्रिती खरबंदा) या तिघीही अनुक्रमे मॅक्स, हॅरी आणि रॉकीच्या प्रेमात पडल्या आहेत. त्यात हॅरीला आवाजाची समस्या आहे. कुठलाही मोठा आवाज झाला की त्याची स्मृती हरवते, शिवाय त्याला चित्रविचित्र स्वप्ने पडतात ज्यात तो कुठल्या तरी जुन्या काळातील दृश्ये पाहत असतो. रॉकी बोलताना नेहमी ‘तो’ आणि ‘ती’चा गोंधळ घालत असतो. मॅक्स त्यातल्या त्यात लंगडी गाय शहाणी असा प्रकार असला तरी तो फक्त बलवान प्राणी आहे. या तिघांची गाठ ज्या तिघींशी पडली आहे त्याही फार थोर नाहीत. तर या तीन जोडप्यांना कुठे तरी भन्नाट ठिकाणी लग्न करायचे असते, त्यामुळे त्यासाठी ठिकाण शोधणाऱ्यांना भारतात सितमगढलाच यावे लागते. सितमगढमध्ये आल्यावर मात्र हॅरीच्या कृपेने त्यांचे आयुष्य ६०० वर्षांनी बदलते. म्हणजे भूतकाळात त्यांच्याशी जोडलेली घटना आठवते आणि आता त्यांच्या ज्या जोडय़ा आहेत त्यातही याची बायको त्याला आणि त्याची बायको याला.. असा बदलाबदलीचा प्रकार घडल्याचेही लक्षात येते. अर्थात, लावलेल्या जोडय़ांमधली चूक सुधारायची तर मुळात सगळ्यांनाच भूतकाळ आठवायला हवा. यासाठी मग हॅरी, हॅरीचा भूतकाळातील नोकर पास्ता (चंकी पांडे) यांची धडपड, प्रत्येकाची भूतकाळ आठवण्याची प्रक्रिया, पूर्वजन्मातील त्यांची कथा या सगळ्यात बऱ्यापैकी १४५ मिनिटे मारून नेता येतात. तशी ती मारून नेण्यात ही सगळीच टीम यशस्वी ठरली आहे.

मुळातच हा चित्रपट बिनडोक आहे हे एकदा मान्य केले की कथा वगैरेवर चर्चेत काही अर्थच उरत नाही. पण विनोदी चित्रपट करायचा आणि मूर्खपणा करायलाही वाव आहे म्हणून समोरच्या प्रेक्षकाला किती गृहीत धरायचे, याचीही काही मर्यादा असायला हवी. कोही तरी कथा हवी म्हणून यात दोन काळांचे संदर्भ आहेत. १४१९च्या काळाचा संदर्भ देताना एका प्रसंगात नायक इंग्रजी झाडताना दिसतो. अर्थात, याचाही वापर विनोदनिर्मितीसाठी केला आहे या दाव्यात काहीही तथ्य असू शकत नाही. चित्रपटातील सगळ्यात जास्त वेळ अक्षय कुमारला दिला गेला आहे. त्यामुळे सर्वाधिक अक्षयचाळे आपल्याला पाहायला मिळतात, ते अगदीच असह्य़ नसले तरी अनेक दृश्यांमध्ये अतिशयोक्ती आहेच. बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांनाही एकाच साच्यातील भूमिका तेही केवळ अक्षय कुमारला पुढे करण्यासाठी करायच्या असल्याने त्यात काही फार नावीन्य नाही. पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा यांनाही सहजतेने नायिका म्हणून जे दिले आहे ते मोठय़ा आत्मविश्वासाने निभावून नेण्याचे काम आहे ते त्यांनी चोख बजावले आहे. त्यातल्या त्यात क्रिती सननला काही एक वेगळेपणा दाखवता आला आहे. बाकी ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांच्यापासून जॉनी लिव्हर, शरद केळकर आणि भल्लालदेव फेम राणा डुग्गुबाती याच्यापर्यंत सगळे आपापल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका पार पाडतात. बाकी कथा-संगीत सगळ्याच नावाने बोंब असलेला ‘हाऊसफुल्ल ४’ हा चित्रपट धड विनोदी भयपटही वाटत नाही

आणि निव्वळ विनोदी चित्रपटही ठरत नाही. काही ठरावीक प्रसंगांतच आपल्याला हसू येते. त्यामुळे बिनडोकपणाची सीमा गाठून निर्माते-दिग्दर्शकही थकले आहेत की काय अशी शंका येते.  दिग्दर्शक – फरहाद सामजी

कलाकार – अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सनन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, रणजीत, जॉनी लिव्हर, चंकी पांडे. शरद केळकर आणि राणा डुग्गुबाती.