सध्या संपूर्ण देशात सुरु असणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या लोकांना अभिनेता जावेद जाफरीने ट्विट करत चांगलेच फटकारले आहे. जावेदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या व्हायरल होत असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘शोले चित्रपटात गब्बरने ठाकुरच्या संपूर्ण कुटुंबीयांना मारले तेव्हा संपूर्ण गावकरी शांत राहिले? पण जेव्हा गब्बरने अब्दुल चाचाच्या मुलाला मारले तेव्हा संपूर्ण गाव मिळून जय आणि वीरुला गावातून बाहेर काढण्यासाठी एकत्र आले’ असे जावेदने शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये लिहिलेले आहे.

याच पोस्टमध्ये सर्वात खाली या चित्रपटाची कथा सलीम जावेदने लिहिली असलेल्याचे म्हटले आहे. शोले चित्रपटाचे हे पोस्टर लोकांना भडकवण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे जावेदचे म्हणणे आहे. तसेच हा फोटो शेअर करत जावेदने ‘खरचं? आपण कोणत्या मार्गाने जात आहोत? आपण खालची पातळी गाठली आहे? हा आपल्याला हवा असलेला भारत देश आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे.

त्यानंतर जावेदने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी एका पोस्टबद्दल वक्तव्य केले आहे. या पोस्टमध्ये अभिनेता फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे. ‘फरहान अख्तरचा आगमी चित्रपट तुफान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा चित्रपट पाहण्याआधी त्याने देशाचे काय नुकसान केले होते याचा विचार करा’ असे त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.