बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येते आहे. मात्र यामध्ये अनेकांना एका गोष्टीचा विसर पडला आहे. आतापर्यंत एकाही पाकिस्तानी कलाकाराने उरीतील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला नाही. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये सक्रीय असणारे पाकिस्तानी कलाकार नेहमीच इतर देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल शोक व्यक्त करत असतात. त्यामुळे या मंडळींनी उरीतील दहशतवादी हल्ल्याचा निषेध का केला नाही, हा प्रश्न निर्माण होतो आहे.
बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेले पाकिस्तानी कलाकार समाज माध्यमांवरही तितकेच सक्रीय आहेत. फवाद खान, माहिरा खान आणि अली जफर यांनी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला होता. ‘पॅरिस हल्ला धक्कादायक आणि दु:खदायक आहे. पॅरिससाठी प्रार्थना करा. मानवतेसाठी प्रार्थना करा’ असे ट्विट पॅरिस हल्ल्यानंतर फवाद खानने केले होते. तर ‘पॅरिससाठी प्रार्थना करा. शांततेसाठी प्रार्थना करा’, असे ट्विट गायक आणि अभिनेता अली झफरने केले होते. तर माहिरा खानने ‘ह्रदयद्रावक. आपण कोणत्या जगात राहतो. माझ्याकडे शब्द नाहीत’, अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ओरलँडोमध्ये झालेल्या गोळीबारानंतरही माहिराने दु:ख व्यक्त केले होते.
जगभरातील दहशतवादी हल्ल्यांबद्दल दु:ख व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांनी उरीतील हल्ल्यानंतर शोक व्यक्त केलेला नाही. मध्यंतरी फवादने भारताबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते. ‘मला भारताने कायमच प्रेम दिले आहे. इथे नेहमीच माझे स्वागत करण्यात आले. भारतात येणे हा नेहमीच माझ्यासाठी खास अनुभव राहिला आहे’, अशी भावना फवादने व्यक्त केली होती. मात्र कोट्यवधी भारतीयांसाठी दु:खद ठरलेल्या उरी हल्ल्याबद्दल फवादने चकार शब्ददेखील काढलेला नाही.
फवाद खान करण जोहरच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात झळकणार आहे. याआधी तो कपूर एँड सन्स आणि खुबसूरत या चित्रपटांमध्ये झळकला आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांना फार मोठे यश मिळालेले नाही. माहिरा खान कितपत यश मिळते, ते तिच्या ‘रईस’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन ठरेल. यातही या चित्रपट शाहरुखमुळे यशस्वी ठरण्याची शक्यता अधिक आहे. गायक आणि अभिनेता अली जफरला अद्याप तरी नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही.
भारतीयांनी नेहमीच सर्वच देशांच्या कलाकारांवर भरभरुन प्रेम केले आहे. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्येही परदेशी मॉडेल्सची संख्या सर्वाधिक होती. पाकिस्तानी कलाकारांनादेखील भारतीय लोकांनी नेहमीच स्विकारले आहे. मात्र भारतात राहून प्रसिद्धी, पैसा कमावणाऱ्या या मंडळींना भारतीयांच्या भावनांची किंमत नसेल, तर मग या कलाकारांचा काय उपयोग, असा प्रश्न आता निर्माण होतो आहे.