दिलीप ठाकूर
आपल्या हिंदी चित्रपटातील अनेक गोष्टींतील एक म्हणजे, ‘आदमी सोचता कुछ और है और होता कुछ और है…’ अर्थात ते घडतानाच एखाद्या व्यक्तिमधील गुणवत्ता कुठे कधी कशी उपयुक्त ठरेल हे काहीच सांगता येत नाही हेदेखील तेवढेच खरे, सुभाष घई दिग्दर्शक झाला हेदेखील अगदी असेच घडले .

तो खरं तर अभिनेता बनायला आला होता. निर्माता-दिग्दर्शक आत्माराम याने आपल्या ‘उमंग’ चित्रपटात अनेक नवीन चेहर्‍याना संधी दिली त्यात हादेखील होता. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना’मधील राजेश खन्नाच्या डबल रोलमधील पायलट भूमिकेतील राजेशचा मित्र सुभाष घईच होता. ‘ग्रहण’ नावाच्या चित्रपटात तो चक्क नूतनचा नायक होता.

अभिनेता म्हणून जम बसत नाही हे लक्षात येताच सुभाष घईने बी. बी. भल्ला याच्यासोबत जोडी जमवत पटकथा लेखन सुरु केला. ‘खान दोस्त’ वगैरे चित्रपट लिहिताना निर्माता-दिग्दर्शकांशी भेटीगाठी सुरु असतानाच ‘गुमनाम’, ‘पारस’ वगैरे चित्रपटाचे निर्माते एन. एन. सिप्पी यांची घईशी भेट झाली. स्टोरी सिटिंगच्या वेळेस घईने आपल्या पटकथेचे विशिष्ट शैलीत वाचन सुरु केले. सिप्पी हे चित्रपट निर्मितीत वाकबगार व्यक्तिमत्व. ते घईची एकूणच पटकथा सादरीकरणाची पध्दत पाहून इतके व असे प्रभावित झाले की, याच पध्दतीने चित्रीकरण करण्याचे पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास दाखव असे म्हणतच सुभाष घईला दिग्दर्शनाची संधी दिली. हा चित्रपट होता, ‘कालीचरण’ (१९७६) वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचे हे नाव असल्याने या चित्रपटाची प्रसिद्धी काहीशी सोपी झाली. पण आपल्या पहिल्याच चित्रपट दिग्दर्शनात सुभाष घईने मनोरंजनाचा मसाला खच्चून भरला.

पत्नी व दोन मुलांसह सुखाचे आयुष्य जगत असणारा इन्स्पेक्टर प्रभाकर (शत्रुघ्न सिन्हा) खलनायक दीनदयाल उर्फ लायनच्या (अजित) गँगकडून मारला गेलाय हे फक्त पोलीस कमिशनरलाच (प्रेमनाथ) माहित असते. पण खलनायकाच्या टोळीला बेसावध ठेवण्यासाठीच पोलीस कमिशनर एक धाडसी निर्णय घेतात. प्रभाकरसारखाच दिसणारा खौफनाक कैदी कालीचरणला (शत्रुघ्न सिन्हा दुहेरी भूमिकेत) पोलीस इन्स्पेक्टर करतात. यासह आणखीन काही घडामोडी घडतात आणि चित्रपट भरपूर मनोरंजन करतो. चित्रपटात रिना राॅय, मदन पुरी, डॅनी वगैरे कलाकार आहेत. पण शत्रुघ्न सिन्हासाठी हा चित्रपट खूपच महत्त्वाचा होता. व्हीलन म्हणून करियर सुरु करणारा शत्रुघ्न सिन्हा त्यात जम बसत असतानाच हीरोगिरीकडे वळला. पण त्यात त्याला हवे असलेले यश ‘कालीचरण’ने दिले. त्याच्या आक्रस्थाळी अभिनयाला साजेसाच तर हा चित्रपट होता.

सुभाष घईचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून असा प्रवास सुरु होतानाच त्याने धक्कादायक ‘टर्न अॅण्ड ट्विस्ट’ आणि गीत-संगीत-नृत्य याची रेलचेल याची छान केमिस्ट्री जमवली आणि मग तीच त्याची दिग्दर्शनीय शैली ठरली. इंदरजीतसिंग तुलसी व रवींद्र जैन यांच्या गीताना कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते. ‘जा रे जा ओ हरजाई’, ‘एक बट्टा दो’ वगैरे गाणी लोकप्रिय झाली.

सुभाष घईचे दिग्दर्शन पदार्पण यश इतक्यावरच थांबत नाही. ‘कालीचरण’ची दक्षिणेकडील चारही भाषेत रिमेक झाली. तेलगूत ‘कैदी कालीदासू’ (१९७७), कन्नडमध्ये ‘कलिंगा’ (१९८०), तमिळमध्ये ‘संगगिली’ (१९८२) आणि मल्याळममध्ये ‘पाथमुदयम’ (१९८५) . सुभाष घई ‘शोमॅन’ निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपले स्थान निर्माण करणार हे पहिल्याच चित्रपटाने सिध्द केले. पण त्याला ती संधी कशी मिळाली? तर समोरच्या व्यक्तीला प्रभावित करता येईल अशा बोलण्या-सांगण्याच्या शैलीने. चित्रपटाच्या जगातील ते चलनी नाणे आहे असे म्हटलं तरी चालेल.