अमिताभ बच्चन यांनी देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा मराठी अवतार ई टीव्ही मराठीवर सुरू झाला. अमिताभ यांच्या भूमिकेत सचिन खेडेकर कार्यक्रमाची सूत्रे सांभाळत असले तरीही या कार्यक्रमामागचा लिहिता हात कोण ही उत्सुकता सगळ्यांनाच आहे. ‘वृत्तान्त’ने याचा शोध घेत मराठी केबीसी कोण होणार मराठी करोडपती या कार्यक्रमाचा कणा असलेल्या अभिनेता-लेखक-दिग्दर्शक हृषिकेश जोशीला पहिल्यांदाच वाचकांसमोर आणले आहे.
‘केबीसी’ला लेखक असतो हे कोणाच्या कल्पनेतही नव्हते. अमिताभ बच्चन यांच्यासारखा स्वयंभू कलाकार ही सूत्रे सांभाळत असताना त्यांच्या मागे असलेल्या लेखकांच्या टीमचा मात्र कधीच उल्लेख झाला नाही. पण मराठी केबीसी पहिल्या तीन भागांमध्येच स्पर्धकांची ओळख, त्यासाठी वापरण्यात आलेली काव्ये, छोटी छोटीच पण आकर्षक वाक्ये यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत हृषिकेशला विचारले असता केबीसीसाठी लिहिण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अत्यंत सुखद धक्का होता असे त्याने सांगितले.
केबीसीचे भारतातील हक्क ताब्यात असलेल्या सिनर्जीचे सिद्धार्थ बसू यांच्या लेखी या कार्यक्रमाच्या लेखकाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यामुळे हा कार्यक्रम मराठीत करीत असताना त्यांना एक चांगला लेखक हवा होता. यासाठी अनेक नावांची चर्चाही झाली. अखेर सचिन खेडेकरांनी माझे नाव सुचविले, असे हृषिकेशने सांगितले. सध्या टीव्ही या माध्यमात मराठी भाषेची वाताहत लागली आहे. वास्तविक मराठी भाषा शांतपणे ऐकत राहावी, आणि आनंद लुटावा अशी भाषा आहे. प्रेक्षकांनाही असाच आनंद देण्याचा प्रयत्न केबीसीच्या माध्यमातून मी करणार आहे. असे हृषिकेश म्हणाला. दरम्यान ‘मराठी केबीसी’चे हे पहिले पर्व ६० भागांचे होणार आहे. प्रत्यक्षात वाहिनीने ८० भागांची तयारी ठेवली असून प्रेक्षक प्रतिसादावर पुढील २० भागांचे भवितव्य अवलंबून असेल, असे समजते.
कशी लिहिली जाते स्क्रिप्ट
केबीसीच्या प्रत्येक भागासाठी आम्ही एक ‘थीम’ ठरवितो. यासाठी सहभागी स्पर्धकांच्या पाश्र्वभूमीचा अभ्यास केला जातो. समोरचा स्पर्धक माणूस म्हणून कसा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धकांची ओळख करून देण्यापासून दोन प्रश्नांच्या मधील संवाद याचा समावेश पूर्ण स्क्रिप्टमध्ये असतो.
हृषिकेशची तयारी कशी?
हा कार्यक्रम सादरकर्त्यांचा असल्याने कार्यक्रमात मूळ कल्पनेपेक्षा लेखन प्रभावी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. माझे वाचन बऱ्यापैकी चांगले असल्याने आतापर्यंत वाचलेल्या साहित्याचा उपयोग स्क्रिप्ट लिहिताना होतोच. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागाच्या चित्रीकरणादरम्यान मी सेटवर उपस्थित असल्याने अनेकदा आयत्या वेळी बऱ्याच सुधारणा केल्या जातात. या कामी मला मुग्धा गोडबोले, गीतकार वैभव जोशी यांची मदत होते.