‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट सायंस’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील शेकडो चित्रपट भाग घेतात. परंतु त्यांपैकी मोजक्याच चित्रपटांना स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा सन्मान मिळतो. या चित्रपटांची किंवा कलाकारांची निवड जगभरातील तज्ज्ञ मंडळी करतात. या तज्ज्ञांच्या समितीत आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना देखील स्थान मिळाले आहे. मात्र अ‍ॅकेडमीच्या या निर्णयावर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी संताप व्यक्त केला आहे.

“घराणेशाहीची अ‍ॅकेडमी” असं ट्विट करुन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अ‍ॅकेडमी संस्था दरवर्षी पर्यावेक्षकांच्या समितीमध्ये नव्या सदस्यांची भरती करत असते. यावेळी त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला आहे. आलिया आणि हृतिक व्यतिरिक्त डॉक्युमेंट्री फिल्ममेकर निष्ठा जैन, अमित मधेशिया, डिजाइनर नीता लूला, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, विज्युअल इफेक्ट एक्सपर्ट विशाल आनंद आणि संदीप कमल यांना देखील यंदाच्या समितीमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. २०२१मध्ये होणाऱ्या या ऑस्कर पुरस्कारासाठी अ‍ॅकेडमी संस्थेने जगभरातील ८१९ नव्या कलाकारांना आमंत्रणं पाठवली आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयावर काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे.