News Flash

‘निडरपणे भीतीवर मात..’

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ह्रतिकने समाजमाध्यमांवर आपले विचार व्यक्त केले

(संग्रहित छायाचित्र)

‘कहो ना प्यार है..’ म्हणत तो २० वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यवर झळकला आणि त्याच्याही ध्यानीमनी नसताना तो पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार म्हणून लोकांची पसंती मिळवता झाला. त्यानंतर आजपर्यंत हिरो म्हणून आपली सद्दी त्याने नव्या-जुन्या अभिनेत्यांमध्येही टिकवून ठेवली आहे. त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता २० वर्षे झाली, दोन दशकांच्या या आपल्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना सतत पुढे जात राहणं, काम करत राहणं हाच आपला मंत्र असायला हवा, असं ह्रतिक म्हणतो.

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ह्रतिकने समाजमाध्यमांवर आपले विचार व्यक्त केले. कलाकाराच्या आयमुष्यात अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असते, यशापयशाची भीती कायम असते. आपला २० वर्षांचा प्रवास हा भीती आणि निडरपणा या दोन शब्दांत उत्तम व्यक्त करता येईल, असे त्याने म्हटले आहे. भीती आणि निडरपणा कायम हातात हात घालून आपल्या आयुष्यात वावरत आले आहेत. भीती नसेल तर निडरपणा नव्हता. त्याने या भीतीला बायबलमधील डेव्हिड आणि गोलिअँथच्या गोष्टीतील भव्यदिव्य अशा गोलिअँथची उपमा दिली आहे. तर निडरपणा हा कायम छोटय़ाशा डेव्हिडसारखा होता. पण बायबलमधील ही गोष्ट कधीही, कोणत्याही प्रकारे रंगवून सांगितली तरी छोटय़ाशा डेव्हिडने गोलिअँथवर मात केली, हेच सत्य आहे, याची आठवण करून देत आपल्याही आयुष्यातील भीतीवर कायम निडरपणाने मात केली, असे त्याने म्हटले आहे.

गेल्या वर्षी दोन सुपरहिट चित्रपट देत ह्रतिक रोशनने आपल्या अभिनयाची जादू कमी झालेली नाही, हे सिद्ध केले होते. दोन वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट देऊनही त्याच्या यशाची पताका उंच राहिली. त्यामुळे निश्चितच गेलं वर्ष त्याच्यासाठी आनंददायी राहिलं असेल, यात शंका नाही. मात्र तरीही आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना त्याने आपल्या यशाचे काहीएक श्रेय हे आपल्या मनातील भीतीला दिले आहे. मला त्या भीतीच्या विचारांची दया येते. या भयभूताने आपल्याला हरवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र सतत काम करत पुढे जात राहण्याचा विचारच आपल्याला इथवर घेऊन आला असल्याचे त्याने स्पष्ट केले. ह्रतिकने वडील राकेश रोशन यांच्या दिग्दर्शनात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधून त्याला यश मिळत राहिले आहे. आता पुन्हा ही बापलेकाची जोडी ‘क्रिश ४’च्या निमित्ताने एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याबद्दल ठोस काहीही त्यांनी जाहीर केलेले नाही. पण ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला आणि आपल्या मुलाच्या पदार्पणाला २० वर्ष झाल्याच्या निमित्ताने खुदद् राकेश रोशन यांनीही ह्रतिकची आठवण एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितली.

तेव्हा तो बिथरला..

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने एका रात्रीत ह्रतिकला सुपरस्टार बनवले. तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याआधी अनेक वर्षे ह्रतिकने आपल्या वडिलांना त्यांच्या चित्रपटांच्या सेटवर सहाय्य केले होते. त्याने लहानपणांपासून चित्रपटांचं जग पाहिलं होतं. त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करत चित्रपटसृष्टीचा अनुभवही घेतला होता. स्टारडम जवळून पाहिलं होतं. मात्र हेच स्टारडम हिरो म्हणून त्याच्या वाटय़ाला आलं तेव्हा तो बिथरला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन-चार महिने उलटले होते आणि एक दिवस ह्रतिक रडत रडत घरी आला, असं राकेश रोशन सांगतात. मी हे सगळं सहन करू शकत नाही. मला काम करणं शक्य होत नाही. मी सेटवर जातो आणि बस भरून भरून मुलंमुली मला भेटायला येतात. त्यांना फक्त मला भेटायचं असतं, माझ्याशी बोलायचं असतं. माझं कामच होत नाही. माझं लक्षही लागत नाही कामात.. अशी त्याची तक्रार होती. मात्र त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आपण त्याला समजावून सांगितल्याचं राकेश रोशन यांनी सांगितलं. समजा ही परिस्थितीच उद्भवली नसती, तर काय झालं असतं तुझ्या आयमुष्यात?, हा विचार कर. तू उलट हे आशीर्वाद आहेत असं समजून काम केलं पाहिजेस, असे सांगत या सगळ्याशी जुळवून घे आणि काम कर असा सल्ला त्यांनी ह्रतिकला दिला. यशाचा ताण न घेता काम करत रहा, हा वडिलांचा सल्ला ह्रतिकने शिरोधार्य मानला. त्याला काय समजायचं होतं ते तो समजला आणि त्याने आपली कारकीर्द उभी केली, असं राकेश रोशन समाधानाने आणि अभिमानाने सांगतात. गेल्या वर्षी आलेल्या ‘सुपर ३०’ आणि ’वॉर’ या दोन चित्रपटांतून ह्रतिक नावाची जादू त्याच्या चाहत्यांना अनुभवता आली होती. आता या वर्षी तो कोणत्या चित्रपटातून दिसणार याबद्दल नक्कीच चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 3:19 am

Web Title: hrithik expressed his views on film kaho na pyaar hai took 20 years to complete abn 97
Next Stories
1 नाट्यरंग : गृहिताची झोपमोड
2 पाहा नेटके : ‘फिशिंग’चे गाव..
3 विदेशी वारे : हवा कोणाची रं?
Just Now!
X