अभिनेता हृतिक रोशनविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार हृतिकविरोधात भादंवि कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हैदराबादमधील सेषाद्रीनगर येथे राहणाऱ्या शशिकांत यांनी हृतिकविरोधात २२ जून रोजी तक्रार दाखल केली होती. शशिकांत यांनी डिसेंबर २०१८ मध्ये हृतिकच्या फिटनेस चेनमध्ये नाव नोंदवलं होतं. वर्षभरासाठी १७,४९० रुपये या सवलतीच्या दरात मी फिटनेस चेनमध्ये सदस्यता मिळवल्याचं शशिकांत यांनी सांगितलं. वर्षभर अमर्यादित वर्कआऊट सेशन्सचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. पण हे आश्वासन फिटनेस चेनकडून पूर्ण करण्यात आले नाही असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

एकूण १८०० लोकांनी फिटनेस चेनमध्ये नाव नोंदवलं होतं. पण या लोकांसाठी पुरेशी जागासुद्धा तिथे उपलब्ध नव्हती. इतकंच नव्हे तर तिथल्या फिटनेस प्रशिक्षकाच्या चुकीच्या वागणुकीमुळे आम्हाला मानसिक त्राससुद्धा झाला, असं शशिकांत म्हणाले. याप्रकरणी हृतिक रोशनसोबतच जिमच्या संचालक मंडळाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.