मध्यंतरीचा काळ असा होता की, आपला ‘ग्रीक गॉड’ म्हणून नावाजलेला एकमेव अभिनेता हृतिक रोशन हा केवळ कंगना राणावतकडून होणारे आरोप आणि त्याच्याकडून केले जाणारे प्रत्यारोप याचसाठी चर्चेत होता. मात्र गेल्या वर्षी जणू किमया झाली. घरच्या चित्रपटांशिवाय हृतिकचे चित्रपट चालत नाहीत, असे ऐकून घ्यायची सवय लागलेल्या हृतिकचे दोन्ही चित्रपट तिकीटबारीवरही यशस्वी ठरले आणि त्याला समीक्षकांचीही पसंती मिळाली. दोन्ही चित्रपट टोकाचे वेगवेगळे होते. एक बिहारमधील शिक्षकाची भूमिका असलेला ‘सुपर ३०’ आणि दुसरा ज्या अ‍ॅक्शनसाठी हृतिक ओळखला जातो ते साकारण्याची पुरेपूर संधी देणारा ‘वॉर’. या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली आणि हृतिक पुन्हा चर्चेत आला. सध्या तो हॉलीवूडपटामागे असल्याचे बोलले जाते आहे. त्यासाठी एका हॉलीवूड एजन्सीने त्याला करारबद्धही केले आहे. याबद्दल चेन्नईमध्ये ‘रॅडो’ कंपनीचा सदिच्छादूत म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला हृतिक बोलता झाला. सध्या माझी भूक ही चांगल्या पटकथांची आहे. त्या हॉलीवूडमधून येऊ देत, बॉलीवूडमधून किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून.. गोष्ट चांगली असेल तर मी कुठेही काम करायला तयार आहे, असे त्याने म्हटले आहे. अर्थातच, हॉलीवूडमध्ये काम करायची उत्सुकता आतून आहेच, असेही त्याने स्पष्ट केले. हॉलीवूडमध्ये काम करायची संधी मिळाली तर एका नवीनच वातावरणात पुन्हा नव्याने अभिनेता म्हणून सुरुवात क रायची संधी मिळेल आणि त्यासाठीच आपण आनंदी आहोत, असे त्याने म्हटले आहे. माव्‍‌र्हल सुपरहिरोजने व्यापलेल्या आपल्याही चित्रपटांच्या जगात त्याचा देशी सुपरहिरो ‘क्रिश’ आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. आता ‘क्रिश’ चित्रपट मालिकेतील चौथा भाग येऊ घातला असल्याचीही चर्चा आहे. मात्र त्याबद्दल आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही, असे हृतिकने म्हटले आहे. ‘क्रिश ४’वर आमचं काम सुरू आहे. अजून त्याबद्दल फार काहीच करता आलेलं नाही, खूप काम बाकी आहे पण तो आम्ही करतो आहोत, हेही तितकंच खरं.. असंही हृतिकने सांगितलं आहे. लोकांना मी ज्या भूमिका करू शकणार नाही, असं वाटतं त्याच भूमिका साकारणं मला आव्हानात्मक वाटतं. ‘सुपर ३०’मधील भूमिका ही त्याप्रकारची होती. त्यामुळे त्या चित्रपटाला यश मिळाल्याचा विशेष आनंद आहे, असे तो म्हणतो. याचे श्रेय तो प्रेक्षकांनाही देतो. प्रेक्षकांना आता वास्तव व्यक्तिरेखा, त्यांच्या कथा पडद्यावर पाहायला आवडतात. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने ते जास्त यशस्वी ठरत आहेत, असे तो म्हणतो.

जग जवळ आले..

जगात अगदी सुईही पडली तर त्याची दखल घेत कधी रोखठोक, कधी चिमटे काढत भाष्य करण्याची संधी महानायक अमिताभ बच्चन कधीही सोडत नाहीत. त्याचीच प्रचीती आता चाहत्यांनी ‘करोना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा घेतली आहे. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्या, सुरक्षेच्या उपाययोजना अमलात आणा, असा संदेश देणारी अमिताभ यांची सरकारी जाहिरात लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र यानिमित्ताने करोनाने कधी नव्हे ते सगळ्या जगाला एकत्र आणले आहे, अशी कोपरखळी अमिताभ यांनी मारली आहे. तत्त्वज्ञ, संगीतकार, सर्जनशील कलावंत, प्रतिभावंतांनी इतकी वर्षे जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले, मात्र ते सपशेल अपयशी ठरले. १९.. कोविड – १९ हा एकच शब्द जगाला एका व्यासपीठावर आणण्यासाठी पुरेसा ठरला आहे. या कोपरखळीबरोबरच आपण स्वत: यासाठी काय काळजी घेत आहोत, याचीही माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. त्यांनी त्यांच्याकडच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सतत साबणाने हात धुण्याची, चेहरा स्वच्छ धुण्याची सूचना दिली आहे. एकमेकांशी हस्तांदोलन करणे टाळा, एकमेकांपासून थोडे अंतर राखा. सतत स्वच्छता ठेवा, अशा सूचना त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. अगदी मोबाइलही दूर ठेवा असा सल्ला त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना दिला आहे. कुठल्याही ठिकाणी जा, कुठलेही माध्यम उघडा.. सध्या करोना १९ हा एकच शब्द तुम्हाला सर्वत्र ऐकू येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.