वजन घटवण्यासाठी इजिप्तवरुन भारतात आलेल्या इमान अहमद हिच्या मदतीनेसाठी आता बॉलिवूडही पुढे आले आहे. हृतिक रोशनची आई पिंका रोशनने इमानला १० लाखांची मदत देऊ केली आहे. इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. यासर्व गोष्टींना सुमारे १ कोटींपर्यंत खर्च येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंकी रोशन यांनी इमानला भेटायलाही जायचे आहे. इमानला भेटून तिचे मनोबळ वाढवण्याची इच्छा पिंकी रोशन यांची आहे.

पिंकी रोशन यांनी दिलेल्या या १० लाखांवर राकेश रोशन यांनीही दुजोरा दिला आहे. इंग्रजी वृत्तपत्र मिड डे यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पिंकी गेल्या तीन महिन्यांपासून इमानशी निगडीत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होत्या. त्यामुळेच इमान मुंबईत येण्यापुर्वीच त्यांनी देणगीची ही रक्कम आधीच पाठवली होती.

इमानबद्दल सांगताना पिंकी म्हणाल्या की, गेली २५ वर्ष कोणी अंथरुणाला खिळून राहीलेला मी विचारही करु शकत नाही. कोणाचेही आयुष्य वाचवण्यापेक्षा मोठे काहीच नाही. हृतिक इमानला भेटणार की नाही या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सध्या हृतिक भारतात नसल्यामुळे तो इमाला भेटेल की नाही याबद्दल आता काही सांगू शकत नाही.

हृतिक इमानला भेटेल की नाही हे माहित नसले तरी इमानला मात्र एका अभिनेत्याला स्वतःहून भेटायचे आहे. तो अभिनेता म्हणजे सलमान खान. तिला एकदा तरी सलमानला भेटायचे आहे. यावर सलमानचे वडिल सलीम खान यांनी सांगितले की, याबाबतीत कोणी अधिकृतरित्या कळवल्यास तर सलमान नक्कीच बेटायला जाईल. रुग्णालयात इमान बॉलिवूड सिनेमेच बघते. तिला ही भाषा जरी कळत नसली तरी तिला बॉलिवूड संगीत फार प्रिय आहे. सलमानचे दबंग आणि सुलतानमधली गाणी तिला फार आवडतात.