करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे घरात बसलेले कलाकार विविध प्रकारची कामं करुन आपला वेळ घालवत आहेत. काही जण घराची साफ सफाई करत आहेत. तर काही जण व्यायाम वगैरे करताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेचा हृतिक रोशन चक्क पियानो शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याचा अतिरिक्त अंगठा त्याला पियानो वाजवूच देत नसल्याची तक्रार त्याने केली आहे.
हृतिक रोशनने इन्स्टाग्रानवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पियानो वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. खरं तर हृतिकला लहानपणापासून हे वाद्य शिकण्याची इच्छा होती. परंतु वेळेअभावी त्याला ते शक्य झाले नाही. सध्या लॉकडाउनच्या निमित्ताने त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे. मात्र यावेळी त्याचा अतिरिक्त अंगठा त्याला पियानो वाजवण्यापासून रोखत आहे. थोडक्यात काय तर १० ऐवजी ११ बोटं असल्यामुळे पियानो वाजवताना त्याला अडथळे येत आहेत. अशी गंमतीशीर तक्रार हृतिकने या व्हिडिओमध्ये केली आहे.
हृतिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमार्फत हृतिकने आपल्या चाहत्यांना वेळेचा सदुपयोग करण्यास सांगितले आहे. घराबाहेर पडून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा या २१ दिवसांमध्ये नवी कौशल्य आत्मसाद करण्याची विनंती त्याने केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 12:20 pm